मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाइल अॅप्लिकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंगळवारी मंत्रालयात करण्यात आलेल्या ‘आसरा’ या मोबाइल अॅप्लिकेशनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने ‘आसरा’ या अॅपच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या अॅपचे सादरीकरण करून माहिती दिली. या वेळीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटायझेशनची चांगली सुरुवात केली आहे. झोपडपट्टीवासीयांना विविध सोयीसुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ‘आसरा’ अॅपचा उपयोग नक्कीच चांगला होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटायझेशन करावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.कोणती माहिती मिळणार?‘आसरा’ हे अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून मुंबई पालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती यात असेल.जीपीएसच्या मदतीने याद्वारे वैयक्तिक झोपडीची माहिती, प्रस्तावितयोजना व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित असलेल्या योजनांचीही माहिती मिळू शकते.सामान्य झोपडीधारक हे आपला झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती घेऊ शकतात.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा झोपडीधारकांसाठी ‘आसरा’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:58 AM