झोपडपट्टीवासीयांना मिळणार दुप्पट पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:18 AM2018-01-16T05:18:25+5:302018-01-16T05:18:39+5:30
झोपडपट्टी भागात राहणा-या नागरिकांना प्रति माणशी ९० लीटर पाणीपुरवठा करण्याचा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे
मुंबई : झोपडपट्टी भागात राहणा-या नागरिकांना प्रति माणशी ९० लीटर पाणीपुरवठा करण्याचा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत माणशी केवळ ४५ लीटरवर तहान भागविणाºया झोपडपट्टीवासीयांना दिलासा मिळाला आहे. या ठरावाबरोबरच इमारतींमधील रहिवाशांना माणशी १८० लीटर पाणीपुरवठ्याची सूचनाही मान्य करण्यात आली आहे.
मुंबईला दररोज तीन हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक कुटुंबात सरासरी पाच माणसे गृहीत धरून पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रति माणशी ४५ लीटर तर इमारतींमध्ये प्रति माणशी १३५ लीटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. पाण्याची मागणी यापेक्षा अधिक असल्याने मुंबई पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा या रहिवाशांना अपुराच पडत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रती माणशी ४५ ऐवजी ९० लीटर पाणीपुरवठा करण्याची मागणी सुजाता पाटेकर या नगरसेविकेने ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेत मांडली होती. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्याने ही सूचना मंजूर करीत आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली. त्यांनी हिरवा कंदिल दाखवल्यास पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.