माजी प्रेयसीला मारहाण, लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तल याच्यावर मारहाण आणि लैंगिक अत्याचाराचा आरोप त्याच्या माजी प्रेयसीने केला आहे. याप्रकरणी तिने खार पोलिसात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तक्रारदार ही वांद्रेतील रहिवासी असून गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांची ओळख झाली होती. त्या दरम्यान दारूच्या नशेत मित्तलने तिच्यावर अत्याचार केल्याचे तिचे वकील निरंजन शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर पुन्हा १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी त्याने तिच्या घरात शिरून तिचा गळा आवळत तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजीदेखील तो तिच्या घराच्या जवळपास घिरट्या घालत होता, मात्र शेट्टी यांनी त्याला हटकले व तो निघून गेला. मित्तलच्या हल्ल्यात ती जखमी झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद केला असून चौकशी सुरू आहे.