मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी हीसुद्धा या मुंबापुरीचे एक वैशिष्ट्यच मानले जाते. आजही ‘मुंबईदर्शन’च्या पॅकेजमध्ये आवर्जून धारावी झोपडपट्टीचा परिसर फिरविला जातो. या झोपडपट्टीतील लोकांचे राहणीमान, जीवनशैली हे येथील वेगळेपण आहे. या झोपडपट्ट्यांचे रूपडे पालटण्यासाठी मुंबई शहर-उपनगरातील तरुण, तरुणींच्या चमूने नुकतीच ‘चल रंग दे’ ही मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत झोपडपट्ट्यांना विविध रंगांचा साज चढविण्यात आला.या मोहिमेसाठी जवळपास हजार लोकांनी नोंदणी केली होती. त्यातील ४०० तरुण-तरुणींनी या उपक्रमात सहभागी होऊन, घाटकोपर येथील असल्फा झोपडपट्टी परिसरातील १२० घरांच्या भिंतींना रंगकाम केले. या उपक्रमात तरुणांनी पिवळा, लाल, निळ्या अशा वैविध्यपूर्ण रंगांनी भिंती रंगवून झोपडपट्टीचे जणू रूपडे पालटले. मुंबईचे वैशिष्ट्य असलेला हा परिसर वेगळ्या दिमाखात उठून दिसत होता.याविषयी बोलताना मोहिमेचे अमित सहाय यांनी सांगितले की, मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा परिसर हा सर्वोत्तम कॅनव्हास आहे. यावर केलेले रंगकाम हा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनेल. या रंगांतून केवळ बाह्यरूपच नव्हे, तर झोपडपट्ट्यांची वेगळी संस्कृती निश्चितच प्रतिबिंबित होईल. तीन दिवस सुरू असलेल्या या उपक्रमातून केवळ पहिला टप्पा पार पडला आहे. भविष्यातही मुंबई शहर उपनगरातील अशा झोपडपट्ट्यांमध्ये असा उपक्रम राबवून त्यांना नवी ओळख देण्यात येईल.
झोपडपट्ट्यांना रंगीबेरंगी साज! मुंबईतील तरुण-तरुणींची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 1:56 AM