विमानतळालगतच्या झोपडपट्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:09 AM2021-08-14T04:09:33+5:302021-08-14T04:09:33+5:30
दाटीवाटीच्या वस्त्या; पुनर्वसनाचा प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित, प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ ...
दाटीवाटीच्या वस्त्या; पुनर्वसनाचा प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित, प्रवाशांचा जीव मात्र धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ पेट्रोलयुक्त बाटली आढळल्याने बुधवारी रात्री सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली. तपासानंतर ही बाटली लगतच्या झोपडपट्टीतून भिरकावल्याचे समोर आले. त्यामुळे विमानतळाला अगदी खेटून असलेल्या या दाटीवाटीच्या वस्त्या दिवसागणिक सुरक्षा यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.
बाटलीत केवळ ५० मिली पेट्रोल असले, तरी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कुर्ला, सांताक्रूझ, अंधेरी परिसरात अगदी विमानतळाच्या भिंतीला लागून झोपडपट्ट्या आहेत. गावदेवी, संजय नगर, बैलबाजार परिसरातील संरक्षक भिंती इतक्या लहान आहेत की, त्यावरून एखादा मनुष्य आत प्रवेश करू शकतो. दोन वर्षांपूर्वी रात्रीच्यावेळी एका मनोविकारग्रस्ताने अशाप्रकारे आत शिरून विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवेश केला होता. सतर्क असलेल्या सीआयएसएफ जवानांनी वेळीच त्याला रोखले. मात्र, या प्रसंगानंतर सुरक्षा भिंतींजवळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाऊ लागल्याची माहिती विमानतळाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या मुंबई विमानतळाचे २००६मध्ये खासगीकरण करण्यात आले. त्यावेळेस झोपडपट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावून संबंधित जागा विमान प्रचलनासाठी उपयोगात आणावी, असे आदेश देण्यात आले होते. पण १५ वर्षांनंतरही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. एका खासगी कंपनीला अतिरिक्त एफएसआय देऊनही त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्न का मार्गी लावला नाही, याच्या तपशीलात जाण्याची गरज आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनचे सरचिटणीस नितीन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
आतापर्यंत विमानतळालगतच्या झोपडपट्ट्यांमधून केवळ दीड-दोन हजार रहिवाशांना स्थलांतरित करण्यात यश आले आहे. मात्र, आजही ८० हजारांहून अधिक नागरिक तेथे राहत आहेत. ही जागा २०० ते ३०० एकर असून, ती कधी परत मिळवणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. नवनिर्वाचित हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. कारण देशातील सर्वात व्यस्त विमानतळाची सुरक्षा अशी वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असेही जाधव म्हणाले.
यासंदर्भात मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
........
‘सीआयएसएफ’ काय करते?
- मुंबई विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे (सीआयएसएफ) आहे. अशाप्रकारे कोणतीही घटना घडल्यानंतर ‘ए. एस. पी.’ प्रक्रियेनुसार तपासणी केली जाते. कालच्या घटनेनंतरही ही पद्धत वापरली गेली. विमानतळाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सीआयएसएफकडून सांगण्यात आले.
- झोपडपट्टीतून होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी विमानतळाच्या संरक्षक भिंतींलगत टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. शिवाय रात्रीच्या वेळीही हालचाली दृष्टीस पडाव्यात यासाठी विशिष्ट अंतरावर दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे भिंतींवरून उडी मारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा कोणतीही वस्तू भिरकावल्यास असे प्रकार तत्काळ सुरक्षारक्षकांच्या नजरेत येतात.
..........
विमानतळाच्या आत ज्वलनशील पदार्थ फेकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. स्थानिकांपैकी कोणाच्या निदर्शनास हा प्रकार आला असेल, तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. आज पेट्रोल फेकून शिक्षा झाली नाही तर संबंधित व्यक्ती पुढच्यावेळी आणखी मोठा प्रकार करू शकते. त्याला वेळीच अटक करण्याची गरज आहे.
- नितीन जाधव, सरचिटणीस, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशन
............
घटनाक्रम असा...
- विमानतळालगत असलेल्या गावदेवी झोपडपट्टीतून बुधवारी रात्री पेट्रोलयुक्त बाटली मुंबई विमानतळाच्या आत भिरकावण्यात आली.
- धावपट्टीनजीक काहीतरी पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीआयएसफ जवानांनी तत्काळ त्यादिशेने धाव घेतली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले.
- ज्वलनशील पदार्थ असल्याने बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले. तपासणी केल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने बाटली जप्त केली.
- त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आसपासच्या झोपडपट्टीत शोधकार्य राबविले. परंतु, बाटली फेकणारी व्यक्ती हाती लागली नाही.