मुंबई : पुणे , मुंबई सारख्या शहरांत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असून सध्याच्या परिस्थितीत शहरात घरातून बाहेर पडून दूरवरचा प्रवास करणे अशक्य असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शहरात छोटी छोटी तपासणी केंद्रे सुरु करावीत. त्या केंद्रावर दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका पोहचविण्याची आणि गोळा करण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून द्यावी. शक्यतो ही केंद्रे शिक्षकांच्या घराजवळ असल्यास शिक्षकांना सोयीचे ठरू शकेल आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम ही वेळेत पूर्ण करता येणे शक्य होऊन निकाल वेळेवर लावता येईल. लॉकडाऊनच्या कालावधीत दहावी बारावीचे निकाल उत्तरपत्रिका तपासणीमुळे लांबणीवर पडणार असल्याने अभाविपने अशा काही सूचनांचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ई मेलद्वारे पाठविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीप्रमाणे शिक्षण विभागाची परिस्थितीही योग्य निर्णय घेऊन सांभाळली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.लॉकडाऊन दरम्यान शिक्षकांना पेपर तपासणीचे काम घरी करता येईल अशी शिथिलता शिक्षण मंडळाने दिली असली तरी शिक्षकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्याने, उत्तरपत्रिका तपासणीला होणाऱ्या विलंबाचा फटका निकाल उशिरा लागण्यावर होणार आहे. यावर उपाय म्हणून अभाविपमार्फत काही सूचना व मागण्या शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. अन्य ठिकाणच्या शिक्षकांना उत्तरपत्रिका सरकारमार्फत घरपोच पोहचविण्याची व्यवस्था करण्यात यावी असे देखील अभावीपमार्फत सुचविण्यात आले आहे. केंद्रावर उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शिक्षकांना पासेसची व्यवस्था करावी आणि शक्यतो हे पासेस व्हाट्सअप किंवा ई मेलमार्फ़त पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.दहावीच्या भूगोलाच्या पेपर संदर्भात सगळ्या विषयांची सरासरी घेण्याऐवजी केवळ इतिहासाच्या पेपरच्या गुणांचा विचार करून भूगोलाचे पेपर देण्यात यावेत असे अभावीपमार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याना सुचविण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना गणित , विज्ञानसारखे विषय अवघड जात असल्याने सगळ्यांसाठी एकच मापदंड ठेवल्यास अन्याय होऊ शकतो अशी शक्यता या निमित्ताने त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. सोबतच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या केवळ पहिल्या सत्राचा विचार न करता वर्षभरातील परफॉर्मन्सचा विचार करावा आणि गुण महाविद्यालयांनी द्यावेत अशी मागणी अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिकेत ओव्हाळ यांनी केली आहे.