फाइव्ह स्टार हॉटेलात चहा सांडून चिमुकली जखमी; जे डब्लू मॅरियट हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:22 PM2023-10-01T12:22:11+5:302023-10-01T12:22:22+5:30
सहार पोलिसांनी तिथली वेट्रेस मोनालिसा बसुमती हिच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मुंबई : आई-वडिलांसोबत सहाराच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये बुफे ब्रेकफास्टसाठी आलेल्या मायरा जैन (७) या मुलीवर उकळता चहा सांडून ती गंभीर जखमी झाली. या विरोधात जामनेर येथे शेती करणारे तिचे आजोबा विलासचंद्र पोरवार (७२) यांच्या तक्रारीनंतर सहार पोलिसांनी तिथली वेट्रेस मोनालिसा बसुमती हिच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मायराचे वडील कामानिमित्त २४ सप्टेंबर रोजी मुंबईत पत्नी राजेश्वरी (४२), मोठी मुलगी सारा (१४) आणि मायरा सोबत आले होते. त्यांनी जेडब्ल्यू मेरियटमध्येच राहण्यासाठी बुकिंग केली. २७ सप्टेंबर रोजी मायरा ब्रेकफास्ट घेत असताना बसुमती ही उकळत्या चहाची किटली ट्रेमध्ये घेऊन चालली होती. तितक्यात ती मायराला धडकली आणि बसुमतीच्या हातातल्या किटलीतील उकळता चहा मायराच्या अंगावर सांडला. यात तिचा डावा हात भाजला. बसुमतीने मायराला ‘बिल्कुल चूप हो जा रोना नही, किसी को कुछ बोलना नही’, अशी ताकीद दिली. त्यानंतर मायराच्या वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.
जावयाने सगळा प्रकार सांगितल्या नंतर गुरुवारी पोरवार यांनी सहार पोलिसांत धाव घेतली. मायराच्या कुटुंबीयांनी हॉटेल प्रशासनाला घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली. ज्याला त्यांनी नकार दिला, असाही आरोप असून या सगळ्या प्रकारामुळे मायरा आणि तिच्या आईला जबर धक्का बसला आहे.
सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करायला ५ तास लावले. तसेच त्यांनी जेडब्ल्यू मॅरियट मॅनेजमेंटवरही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. हा प्रकार हॉटेल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडला. तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालत सहार पोलिसांना याबाबत चौकशीचे आदेश द्यावे. जेणेकरून पुढे अशा प्रकारांवर अंकुश बसेल.
- विलासचंद्र पोरवार, तक्रारदार, मायराचे आजोबा