Join us

मुंबईकरांच्या मदतीसाठी धावणार आगीचे छोटे बंब

By admin | Published: June 12, 2017 12:39 AM

अरुंद रस्ते व चिंचोळ्या मार्गातून वाट काढणे आता अग्निशमन दलाच्या जवानांना सहज शक्य होणार आहे. वाहतूक कोंडीत व झोपडपट्टी, दोन इमारतींच्या गल्लीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : अरुंद रस्ते व चिंचोळ्या मार्गातून वाट काढणे आता अग्निशमन दलाच्या जवानांना सहज शक्य होणार आहे. वाहतूक कोंडीत व झोपडपट्टी, दोन इमारतींच्या गल्लीत अडकल्याने आगीचे बंब दुर्घटनास्थळी विलंबाने पोहोचत असल्याने मिनी फायर इंजीनचा उतारा पालिकेने आणला आहे. असे १७ छोटे आगीचे बंब प्रादेशिक वाहतूक कार्यालयाच्या मंजुरीनंतर वापरण्यात येणार आहेत.२०१५ साली काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले. चिंचोळ्या मार्गामुळे त्या दुर्घटनेची तीव्रता वाढली होती. त्यामुळे पालिकेने आगीचे छोटे बंब खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हे आगीचे बंब अखेर दोन वर्षांच्या विलंबानंतर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. तसेच या महिन्याच्या अखेरीस हे बंब मदतीसाठी धावणार आहेत.अग्निशमन केंद्र जवळपास नसलेल्या ठिकाणी आगीचे हे छोटे बंब तैनात ठेवण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईत गोवालिया टँक येथे अग्निशमन केंद्र आहे. मात्र मलबार हिल आणि वाळकेश्वर येथे जवळपास अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे वाळकेश्वर जलाशयाजवळ हा बंब ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे.काळबादेवी येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने मुंबईतील १९३ गगनचुंबी निवासी व व्यावसायिक इमारतींची पाहणी केली. यापैकी ११४ इमारतींनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. मात्र अशा वेळी कार्यवाही आणि कारवाईबाबत प्रशासन कमी पडते. परिणामी वित्तहानीसह जीवितहानी होते.मुंबईची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र अग्निसुरक्षा यंत्रणेसह मुंबईतील पायाभूत सुविधा पुरेशा विकसित झाल्या नाहीत. असे असले तरी अग्निशमन दलाने आधुनिक तंत्रज्ञानासह मनुष्यबळ वाढवण्यावरही भर देणे गरजेचे आहे. दरम्यान, पाश्चात्त्य देशांकडे लक्ष दिले तर त्यांची स्वत:ची आगविरोधी यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि प्रशिक्षित कर्मचारी असतात. आपल्याकडेही ते आहे. परंतु हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे. आगीमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात भारताचा जगात ५६ वा क्रमांक लागतो. बेफिकीर वृत्ती, अक्षम्य दुर्लक्ष आणि अग्निसुरक्षेचा बोजवारा यामुळे जगाच्या तुलनेत भारतात आगीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर ४.६८ टक्के आहे.अमेरिका, ब्रिटन, जपानसारख्या क्षेत्रफळाने मोठ्या देशांपासून ते अगदी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील यासंबंधीचा मृत्यूदरही ०.७५ च्या खाली आहे. देशात आगीमुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, २००८-१२ या कालावधीत आगीमुळे २३६ जणांच्या मृत्यूची नोंद असलेली मुंबापुरी देशातील ८८ शहरांना मागे टाकत याबाबतीतही अग्रस्थानी होती.२०१५ साली काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या भीषण दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले. चिंचोळ्या मार्गामुळे त्या दुर्घटनेची तीव्रता वाढली होती. त्यामुळे पालिकेने आगीचे छोटे बंब खरेदी करण्याचा निर्णय घेतला.