जोगेश्वरीत उभारले ‘छोटे जंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:21 AM2019-07-29T03:21:37+5:302019-07-29T03:21:56+5:30
प्रदूषणाविरोधात लढा : ‘मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट’ पद्धतीने सात हजार झाडांची लागवड
सागर नेवरेकर
मुंबई : वाढत्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट होऊ लागली आहेत. त्यामुळे प्रदूषणाचा मोठा फटका मुंबईसारख्या शहरांना बसत आहे. प्रदूषणाविरोधात लढण्यासाठी जास्तीतजास्त झाडे लावण्याची गरज आहे. अशाच प्रकारे जोगेश्वरी पूर्वेला ‘ग्रीन यात्रा’ संस्थेने ‘छोटे जंगल’ उभारले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, एकूण सात हजार झाडांचे जंगल तयार झाले आहे.
ग्रीन यात्रा संस्थेचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी यांनी या संदर्भात सांगितले की, मुंबईमध्ये जानेवारी २०१९ रोजी मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्टची सुरुवात करण्यात आली. या पद्धतीमध्ये देशी झाडे लावून छोटे-मोठे जंगल तयार केले जाऊ शकते. झाडांसाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरली जात नाहीत, तर फक्त सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये दोन फुटांच्या झाडांची उंची दोन वर्षांत २० ते ३० फुटांपर्यंत वाढते. संस्थेतर्फे लावलेल्या झाडांची उंची सहा महिन्यांत १५ फुटांपर्यंत वाढली आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार चौरस फुटामध्ये ३ हजार झाडे लावली. आता तिथे सात हजार झाडे लावली आहेत. यात करंज, भेंडी, बकुळी, ताम्हण, आपटा, अशोका, गुलमोहर इत्यादी देशी झाडांचा समावेश आहे.
अशी केली जाते झाडांची लागवड!
च्झाडांची वाढ जलदगतीने होण्यापाठीमागचे कारण असे की, एक मीटर जमीन खोदून त्यातील माती बाहेर काढली जाते. त्या मातीत नैसर्गिक घटकांच्या प्रमाणाचा अभ्यास केला जातो, पण जोगेश्वरीत अनेक ठिकाणी जमिनीमध्ये फक्त डेब्रिजच मिळाले. त्यामुळे आम्ही झाडांसाठी पोषक माती दुसºया ठिकाणाहून आणून तेथे झाडांची लागवड केली, पण हे करत असताना मातीमध्ये पाणी थांबून राहावे आणि हवा खेळती असावी, याची काळजी घेण्यात आली. मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट पद्धतीत झाडे ही लेअर पॅटर्नमध्ये म्हणजेच उंचीच्या प्रमाणात लावली जातात, पण हे करताना एकमेकांशेजारी एकाच प्रजातीची झाडे लावली जात नाहीत, पण या पद्धतीचा सर्वाधिक वापर करून कमीतकमी वर्षांत जंगले निर्माण करता येतील, असेही भाष्य प्रदीप त्रिपाठी यांनी केले.
जगभरात तीन हजार वने : जापनीज वनस्पती शास्त्रज्ञ आणि वनस्पती पर्यावरणशास्त्र तज्ज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी ‘मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट’ या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीचा वापर करून जगभरात तीन हजारांहून अधिक वने यशस्वीरीत्या तयार करण्यात आली आहेत.