मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मनसेने जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेला भगवा झेंडा आणलेला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या झेंड्याचे अनावरण केले आहे.
मात्र निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंशी जवळीक साधणाऱ्या राष्ट्रवादीने मनसेच्या नव्या भूमिकेवर टीका केली आहे. राज ठाकरेंची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती यासारखी झाली आहे. सभांना होणारी गर्दी मतात कशी परावर्तित होईल यासाठी राज यांनी प्रयत्न करावेत. एकांगी कारभाराची सवय असेल तर पदाधिकाऱ्यांची फळी उभी राहत नाही हे आधी त्यांनी समजून घ्यावं. तसेच शॅडो कॅबिनेट म्हणजे लहान माझी बाहुली तिची मोठी सावली अशा शब्दात राष्ट्रवादी नेते हेमंत टकले यांनी टोला लगावला आहे.
तर मनसेने आणलेल्या नवीन झेंड्यावर राजमुद्रा वापरणं चुकीचं आहे. अशाप्रकारे राजकारणासाठी राजमुद्रेचा वापर करणं चुकीचा आहे असं मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मांडलं आहे. तसेच अमित ठाकरेंच्या राजकीय पदार्पणाबाबत हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. कोणाला संधी द्यावी हे ते ठरवतील अशी भूमिका मांडली आहे.
पुण्यामध्ये शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली मुलाखत यानंतर मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक वाढली होती. राज ठाकरेंबाबत अनेकदा शरद पवारांनी सकारात्मक विधानं केली होती. राज ठाकरेंना मिळणारा तरुणांचा पाठिंबा लक्षणीय आहे असं मत पवारांनी व्यक्त केलं होतं. तसेच भविष्यात राज ठाकरेंना यश मिळेल असंही सांगितले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे यांची युती होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र काँग्रेसशी आघाडी असल्याने मनसेला महाआघाडीत घेणं राष्ट्रवादीला शक्य नव्हतं. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची निवडणुकीच्या प्रचाराची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत होईल अशी होती.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदावरुन ठाम असणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. त्यामुळे राज ठाकरेंची पुन्हा एकदा कोंडी झाली. याच पार्श्वभूमीवर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत सरकारविरोधात आक्रमक राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण
मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग
मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी
मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"