अमरावतीतील छोटे खेडे ते थेट मेट्रो चालक; मीनल पोटफोडे यांची यशस्वी करिअरगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:29 AM2023-10-20T07:29:36+5:302023-10-20T07:29:57+5:30
नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...
रतींंद्र नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरावतीच्या वरूड तालुक्यातील लोणी यासारख्या लहानशा खेड्यात गेलेले बालपण, घरची बेतासबात आर्थिक स्थिती, आई-वडील शेतीकामात व्यस्त, अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आस आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर मोठी झेप घेत मेट्रोसारख्या आधुनिक प्रणालीची वाहतूक व्यवस्था समर्थपणे सांभाळत आहेत मीनल पोटफोडे...
दहिसर पूर्व ते डी.एन. नगर यादरम्यान धावणारी मेट्रो २ए आणि दहिसर पूर्व ते गुंदवलीपर्यंत धावणारी मेट्रो ७ या मार्गिकेवरील गाड्यांचे सारथ्य मीनल करतात. वेळेवर स्थानकावर पोहोचणे, गाड्या यार्डात घेऊन जाणे, मेट्रोचे दरवाजे उघडणे, प्रवासी गाडीत सुरक्षितपणे चढले, स्थानकात सुरक्षित उतरले यांची खातरजमा करणे, आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मीनल सांभाळत आहेत. त्यांची इथपर्यंतची वाटचाल सोपी खचितच नव्हती.
लोणीसारख्या छोट्याशा खेड्यात शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत शिवाय आई-वडील शेतकरी असल्याने पुरेसे पैसे हाती नाहीत, अशा स्थितीतही मीनल यांनी परिस्थितीसमोर हात टेकले नाहीत. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात अनंत अडचणी आल्या. परंतु, त्या डगमगल्या नाहीत. शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आतेबहीण इंजिनिअर असल्याने मीनल यांनाही त्यांच्यासारखे इंजिनिअर व्हायचे हा निश्चय
पक्का होता.
फेब्रुवारी २०१८ मध्ये अमरावती गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाल्यानंतर फेब्रुवारी २०१९ पर्यंत त्यांनी छोट्याशा कंपनीत काम केले. २०२० मध्ये त्या एमएमआरडीएच्या मेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलर म्हणून कामाला लागल्या. आपल्या मेहनतीच्या बळावर त्या कामात पारंगत झाल्या.
१२ दिवसांत ७ परीक्षा
चांगली नोकरी मिळावी यासाठी सुरुवातीच्या काळात परिश्रम घेणाऱ्या मीनल यांनी इंजिनिअरिंगनंतर १२ दिवसांत तब्बल सात विविध परीक्षा दिल्या. त्या अभ्यासाचा, मेहनतीचा आज फायदा झाला, असे त्या सांगतात.
आधी घर, मग लग्न
सुरुवातीपासूनच घरची परिस्थिती बेताची असलेल्या मीनल यांनी मेट्रोत नोकरीला लागताच आई-वडिलांना नवीन घर देण्याचा संकल्प केला. त्यांच्या मूळगावी नवीन घराचे बांधकाम सुरू असून, या जबाबदारीनंतरच लग्नाचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जबाबदाऱ्यांचे पालन
मेट्रोच्या महिला पायलट म्हणून ड्यूटी बजावत असतानाच त्याच्याशी संबंधित चार वेगवेगळ्या पदांच्या जबाबदाऱ्या त्या उत्तम प्रकारे पार पाडतात. डिझेल इंजिन, सीएमव्ही ऑपरेशन, ट्रेन ऑपरेशन अशी विविध कामे त्या सक्षमपणे करत आहेत.