छोटे पक्ष, अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार; मुंबईत मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 07:20 AM2024-12-01T07:20:49+5:302024-12-01T07:21:11+5:30
समाजवादी पक्षाने सलग तीनही निवडणुकीमध्ये मानखुर्दची जागा मात्र कायम राखली आहे.
महेश पवार
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या ३६ मतदारसंघामध्ये मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. मुंबईकरांनी राज ठाकरे यांच्या मनसे, वंचित, बसपा या पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांना नापसंत केले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला मुंबईतून एकही जागा जिंकता आलेली नाही. तर, समाजवादी पक्षाने सलग तीनही निवडणुकीमध्ये मानखुर्दची जागा मात्र कायम राखली आहे.
२०२४च्या निवडणुकीत मनसेने २६ उमेदवार उभे केले होते. महायुतीचा उमेदवार नसल्याने शिवडीत मनसे उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते मिळाली. पण, वंचित २२, बसपा २९, अन्य पक्ष १५४ आणि ११४ अपक्षांपैकी कुणालाही मतदारांची पसंती मिळालेली नाही.
२०१९ च्या निवडणुकीत मुंबईमधून बसपाने २९, मनसेने २५, वंचितने २३ उमेदवार दिले होते. तर, एमआयएम १०, आपचे ६, समाजवादी पार्टीचे ३, अन्य पक्षांचे ६६ आणि ९० अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील मनसेच्या भांडुप, माहीम, मागाठाणे आणि शिवडी येथील उमेदवारांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली होती.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आणि बसपाने प्रत्येकी ३६ उमेदवार दिले होते. तर, अन्य पक्ष आणि अपक्ष मिळून ३०१ उमेदवार निवडणुकीला उभे राहिले होते. त्यापैकी भायखळा विधानसभेतून एमआयएमचे वारीस पठाण आणि मानखुर्दमधून समाजवादी पार्टीचे अबू आझमी विजयी झाले होते.
पक्ष २०२४ च्या जागा २०१९ च्या जागा २०१४ च्या जागा
भाजप १५ १६ १५
शिवसेना १० (उद्धवसेना) १४ १४
६ (शिंदेसेना)
काॅंग्रेस ३ ४ ५
राष्ट्रवादी १ (अ.प.गट) १ -
सपा १ १ १
एमआयएम - - १