राज्यातील १६ लाख एसटी प्रवासी झाले स्मार्ट कार्डधारक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:11 AM2019-09-16T06:11:43+5:302019-09-16T06:11:54+5:30
एसटीच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक प्रवासी स्मार्ट कार्डधारक झाले आहेत.
- कुलदीप घायवट
मुंबई : एसटीच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १६ लाखांहून अधिक प्रवासी स्मार्ट कार्डधारक झाले आहेत. यापैकी १५ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत.
एसटीच्या ३१ विभागांतून एकूण ३ हजार ९२१ लाभार्थी प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहे, तर २५० डेपोमधून महामंडळाच्या वतीने एकूण ५ लाख ५९ हजार ५६३ आणि खासगी संस्थेकडून ९ लाख ५२ हजार ५१८ प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढले आहेत. त्यामुळे राज्यभरातून एकूण १६ लाख ८३ हजार ४७१ स्मार्ट कार्ड काढले आहेत. यापैकी १५ लाख १२ हजार ८१ ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढले आहेत.
२०२० पर्यंत मुदतवाढ
एसटीतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य केले आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी १ जानेवारी, २०२० पर्यंत मुदतवाढ दिले आहे, असे राज्याचे परिवहनमंत्री अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे. ३१ डिसेंबर, २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून सर्व प्रवाशांनी स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन रावते यांनी केले आहे.
>सुट्या पैशाचे नो टेन्शन
एसटी प्रवासात वाहक आणि प्रवासी यांचा सुट्या पैशांसाठी नेहमी वाद होत असे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली. स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना एसटीतून प्रवास करता येणार असल्याने, काही दिवसात एसटीचे तिकीट हद्दपार होणार आहे. शिवाय, स्मार्ट कार्डच्या माध्यमातून खिशात रोख ठेवणे आवश्यक नाही. स्मार्ट कार्ड रिचार्ज करून प्रवाशांना सुलभरीत्या प्रवास करता येणार आहे.
>काळा व्यवहार हद्दपार!
एसटी महामंडळातील काही वाहक तिकिटाबाबत काळा व्यवहार करायचे. हा व्यवहार बंद करण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना पूरक ठरेल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिकाºयाने दिली.