सुपर मॉमसोबत स्मार्ट मुलांची मज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 04:40 AM2016-11-14T04:40:38+5:302016-11-14T04:40:38+5:30
आई आणि मुलांचे भावनिक नाते उलगडणारा ‘सुपर मॉम, स्मार्ट किड्स हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सहभागी आई- मुलांच्या जोडीने धम्माल
मुंबई : आई आणि मुलांचे भावनिक नाते उलगडणारा ‘सुपर मॉम, स्मार्ट किड्स हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सहभागी आई- मुलांच्या जोडीने धम्माल करून भरपूर बक्षिसे पटकावली.
लोकमत सखी मंच आणि झी टीव्हीतर्फे सुपर मॉम स्मार्ट किड्स स्पर्धेचे आयोजन शनिवारी दादर येथील बी. एन. वैद्य सभागृहात करण्यात आले होते. कुटुंबामध्ये आईचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आई आणि मुलांमधील भावनिक नाते उलगडण्यासाठी सुपर मॉम, स्मार्ट किड्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुपर मॉम आणि त्यांच्या सुपर-डुपर मुलांनी या वेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यानिमित्ताने आई आणि मुलांच्या नात्यांमधील विविध पैलूंचा अनुभव घेता आला. आर्इंसाठी सुपर मॉम ही स्पर्धा घेण्यात आली. चार वेगवेगळ्या फेऱ्यांचा सामना करत सुपर मॉम्सना एकमेकींपेक्षा सरस ठरायचे होते. पहिल्या फेरीत आईने मुलाचा आणि मुलाने आईचा परिचय करून द्यायचा होता. तर दुसऱ्या फेरीतून आई आणि मुलांनी एकत्र येऊन कलाविष्कार सादर करायचा होता. मुलांमधील कला जोपासत या वेळी सुपर मॉम्सनीही धमाकेदार सादरीकरण केले. नृत्य, नाट्याचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. तिसऱ्या फेरीचा आनंद साऱ्या चिमुकल्यांनी लुटला. कारण या फेरीमध्ये आर्इंना मुलासारखे लहान दिसायचे होते. या वेळी अनेक आर्इंनी स्वत:च्या मुलांची हुबेहूब नक्कल करत साऱ्यांना खळखळून हसायला भाग पाडले. याशिवाय लहान मुलांसाठी स्मार्ट किड्स चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातही लहानग्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या चित्रकला स्पर्धेचे परीक्षण पूनम क्षीरसागर आणि समीर मयेकर यांनी केले.
या स्पर्धांसोबतच कार्यक्रमामध्ये नुपुर झंकार ग्रुपच्या नृत्यांगनांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण
करून उपस्थितांची मने जिंकली. (प्रतिनिधी)