पीपीपी मॉडेलमधून ठाणे होणार स्मार्ट - आयुक्त
By admin | Published: July 11, 2015 11:29 PM2015-07-11T23:29:21+5:302015-07-11T23:29:21+5:30
तामिळनाडू सरकारने निर्माण केलेल्या शौचालयांच्या धर्तीवर ठाणे शहरामध्ये शौचालये निर्माण करण्यात येणार असून नवीन प्रकल्प राबविण्यास आर्थिक अडचण असल्याने
ठाणे : तामिळनाडू सरकारने निर्माण केलेल्या शौचालयांच्या धर्तीवर ठाणे शहरामध्ये शौचालये निर्माण करण्यात येणार असून नवीन प्रकल्प राबविण्यास आर्थिक अडचण असल्याने काही प्रकल्प पीपीपी मॉडेलमधून (सरकार व खासगी भागीदारीतून) करून ठाणे शहराला स्मार्ट करण्याचे सूतोवाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अमृत, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती नगरसेवकांना मिळावी, यासाठी महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी आयुक्तांनी ही माहिती दिली. तेव्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध योजनांची माहिती ऐकून ठाणे शहराला स्मार्ट बनविण्याचा निर्धार केला.
या वेळी आयुक्तांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाच ही योजना तुमची आहे. तुम्ही या योजनेशी जोडून घ्या, असे आवाहन केले.
सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्मार्ट सिटी योजना, तिचे महत्त्व, त्यातील तरतुदी आणि निकष याविषयी तपशीलवार माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी स्वच्छ भारत अभियान याविषयी सादरीकरण केले. उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी अमृत योजनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सांगितली. या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध मुद्यांवरील चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)