पश्चिम उपनगरात कोविड तपासणीसाठी स्मार्ट हेल्मेट प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 02:14 AM2020-07-22T02:14:25+5:302020-07-22T02:14:37+5:30
एकाच वेळी दोनशे रुग्ण तपासणे शक्य
मुंबई : पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगाने तपासणी सुरू आहे. यासाठी स्मार्ट हेल्मेटच्या मदतीने एकाच वेळी दोनशे रुग्णांना तपासणे महापालिकेच्या आरोग्य पथकाला शक्य होत आहे. मालाड ते दहिसर या भागांमधील तब्बल दहा हजारांहून अधिक लोकांचा उष्मांक याद्वारे मोजण्यात आला आहे.
यामध्ये ताप अधिक असलेल्या लोकांना वेगळे करून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मालाड ते दहिसर येथील रुग्णसंख्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने महापालिकेने गेल्या महिन्यात मिशन झिरो सुरू केले. याअंतर्गत बाधित क्षेत्रातील लोकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप येणे हे महत्त्वाचे लक्षण आहे.
मात्र ताप ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्मल गनद्वारे एकावेळी एकाचीच तपासणी करण्यात येते. ही संख्या वाढवण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर पालिकेने सुरू केला आहे. या स्मार्ट हेल्मेटवर असलेला सेन्सॉर एका स्मार्ट वॉचला जोडलेला असतो. त्यामुळे तपासणी करताना उष्मांक जास्त असलेल्या व्यक्तींची माहिती तत्काळ स्मार्ट वॉचमध्ये कळते.
भारतीय जैन संघटनेकडून उपलब्ध करून दिलेल्या दोन हेल्मेटच्या माध्यमातून पालिका ही तपासणी करीत आहे. सध्या या स्मार्ट हॅल्मेटच्या माध्यमातून घरोघरी जाऊन, फळविक्रेते, दुकानदार आदींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे.
अशी होते तपासणी
बाधित क्षेत्रात तपासणीसाठी जाणारे पालिकेचे आरोग्य पथक वस्त्यांमधील नागरिकांना घराबाहेर येऊन उभे राहण्यास सांगतात. मग हेल्मेट परिधान केलेली व्यक्ती त्या विभागात फिरते. या स्मार्ट हेल्मेटवर असलेला सेन्सॉर एका स्मार्ट वॉचला जोडलेला असतो. उष्मांक जास्त असलेल्या व्यक्तींची नोंद स्मार्ट वॉचवर होताच त्यांना रांगेतून वेगळे करून त्यांची तपासणी केली जाते. आरोग्य कर्मचारी आणि तपासणी करण्यात येणारी व्यक्ती यांच्यात सुमारे चार ते पाच फुटांचे अंतर असते.