Join us

‘बेस्ट’च्या ग्राहकांना स्मार्ट मीटरचा ‘शॉक’; तांत्रिक अडचणींमुळे ग्राहक त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 9:55 AM

गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असतानाच दुसरीकडे स्मार्ट वीज मीटरमुळे वीज बिलांत चार ते पाच महिन्यांत तीन ते पाच पटींनी वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असतानाच दुसरीकडे स्मार्ट वीज मीटरमुळे वीज बिलांत चार ते पाच महिन्यांत तीन ते पाच पटींनी वाढ झाली आहे, अशा तक्रारी ‘बेस्ट’च्या ग्राहकांनी केल्या आहेत. याप्रकरणी ‘बेस्ट’कडे वारंवार तक्रारी करून प्रशासन काहीच दाद देत नसल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली आहे. 

सायन येथील वीज ग्राहकांच्या वीज बिलात चार महिन्यांपासून वाढ झाली आहे. पहिल्यांदा हजार रुपये येणारे वीज बिल आता चार ते पाच हजार रुपये येते आहे. 

जनआंदोलनाचा इशारा-

गेल्या वर्षभरात ‘बेस्ट’ने नवीन वीज मीटर लावल्यानंतर ग्राहकांना वाढीव वीज बिल येत आहे. पूर्वी वीजपुरवठा खंडित झाल्यावर एक-दोन तासांत पूर्ववत होत होता, पण आता ‘बेस्ट’ योग्य सेवा देत नाही. ‘बेस्ट’ने याबाबत लक्ष न दिल्यास दोन दिवसांत सायन येथे जनआंदोलन केले जाईल.- गजानन पाटील, विधानसभा संघटक, उद्धवसेना, सायन 

स्मार्ट वीज मीटर मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीजदरवाढीच्या रूपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल, हे निश्चित व स्पष्ट आहे.- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

तांत्रिक अडचण-

स्मार्ट मीटर लावण्यापूर्वी विजेचे बिल दोन हजार रुपये येत होते. स्मार्ट मीटर लावल्यानंतर विजेचे बिल साडेतीन हजारांपर्यंत येत आहे. शिवाय स्मार्ट मीटर लावताना निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. संपूर्ण मुंबईत ही अडचण आहे.- संतोष जाधव, चिंचपोकळी 

बिले कमी करून द्या! 

जुलै २०२३ मध्ये प्री-पेड वीज मीटर लादण्यास विरोध केला होता. यातून सरकारला अदानी इलेक्ट्रिसिटीचे भले करायचे होते. जनतेचे मत विचारात न घेता हा निर्णय लादला गेला होता. या मीटरमुळे भरमसाट बिले लादली जातील, अशी चिंता त्यावेळेस मी व्यक्त केली होती. नागरिकांना तक्रारीसाठी मार्गच नसल्यामुळे त्यांना ती भरावी लागतील. आज अनेक भागांत अनेकवेळा वीज नसते. त्यात हे स्मार्ट मीटर प्रकरण अधिकच तापदायक आहे. चौपट बिले आल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. वाढीव बिले कमी करून द्यावीत आणि हे प्रीपेड मीटर लादणे बंद करावे.- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबईबेस्टवीज