Join us

पोलिसांची स्मार्ट कामगिरी; ‘वोडका’ची बाटली, ग्लास सेटवरुन शोधला मारेकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 1:24 AM

दहिसर महिला हत्या प्रकरणातील मारेकरी ताब्यात

मुंबई : बार वेटर असलेल्या दहिसरमधील आर शेख या महिलेची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचे भासवत, मारेकरी स्वपन रोईदास याने पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, शेखच्या घरात सापडलेल्या वोडका या मद्याच्या बाटलीने आणि काचेच्या ग्लास सेटमुळे त्याची पोलखोल होत तो गजाआड झाला.शेखची हत्या श्वास गुदमरून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. त्यानुसार, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमएम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश रोकडे, मराठे, सहायक पोलीस निरीक्षक घार्गे, तोटावार, जगदाळे यांच्या पथकाने चौकशी सुरू केली. शेखच्या घरातील दागिने आणि पैसे चोरीला गेले होते. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत पोलीस पथकाला वाटले. मात्र, शेखच्या घरात एका विशिष्ट ब्रँडची वोडका ही मद्याची बाटली आणि काचेचे दोन ग्लास सापडले. तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्रँड ठरावीक लोकच प्राशन करत असल्याने, बाटलीवरील बॅच क्रमांकावरून वाइन शॉप पोलिसांनी शोधून काढले. त्यावरून हे मद्य खरेदी करणाºया रोईदासबाबत पोलिसांना समजले. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील त्याचा चेहरा टिपला गेला होता. एका मोबाइल क्रमांकावरून त्याने शेखला फोन केल्याचेही पोलिसांना समजले. अखेर पोलीस त्याच्या दहिसरमधील घरी जाऊन धडकले, तेव्हा त्यांना एक ग्लास सेट बॉक्स सापडला. त्यामध्ये निव्वळ चार ग्लास होते आणि त्या बॉक्समध्ये उरलेले दोन ग्लास शेखच्या मृतदेहाशेजारी सापडले होते. रोईदास संशयित होता. कारण त्याने पश्चिम बंगालला पळ काढला होता. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस पथक त्या ठिकाणी रवाना झाले आणि त्यांनी रोईदासच्या मुसक्या आवळल्या. ‘शेख माझ्याकडे पैशाची मागणी करत होती, तसेच ते नाही दिले, तर तिच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधाबाबत ती माझ्या पत्नीला सांगेल, अशी धमकी तिने दिली होती, म्हणून तिला संपविले,’ असे रोईदासने पोलिसांना कबुली जबाबात सांगितले आहे. शेखने मुद्देमालदेखील पोलिसांना दिला.

टॅग्स :खून