Join us

‘कल्पना एक आविष्कार अनेक’मध्ये ‘हसू आणि आसू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:06 AM

मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या विश्वात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेचे यंदाचे ...

मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या विश्वात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेचे यंदाचे विषय सूचक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आहेत आणि त्यांनी स्पर्धेसाठी ‘हसू आणि आसू’ हा विषय दिलेला आहे.

या विषयाच्या विविध पैलूंंना स्पर्श करणारी एकांकिका स्पर्धकांना यात सादर करायची आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निर्मिती खर्च कमी व्हावा, तसेच प्रवास टळावा या उद्देशाने स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष संपर्क आणि कागदपत्रांची देवाणघेवाण टळावी यासाठी प्रवेश प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या एकांकिका चित्रित करून प्राथमिक फेरीच्या मूल्यांकनासाठी पाठवायच्या आहेत. अंतिम फेरी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून नाट्यगृहात घेतली जाणार आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी जानेवारी २०२१ मध्ये, तर अंतिम फेरी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज ‘अस्तित्व’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज आणि एकांकिका पाठविण्याची अंतिम तारीख २६ जानेवारी आहे. प्राथमिक फेरीचा निकाल ३० जानेवारीला घोषित करण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेचे संयुक्त ३४वे वर्ष असून, खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन कलाकारांसह हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही सहभागी होत असतात.