Join us

३० हजारांहून अधिक मुलांसह पाल्यांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:14 AM

५ वर्षांतील आकडेवारी : हरविलेल्यांचा शोध घेण्यात पाेलिसांना यशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरातून निघून गेलेल्या किंवा हरविलेल्या ...

५ वर्षांतील आकडेवारी : हरविलेल्यांचा शोध घेण्यात पाेलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरातून निघून गेलेल्या किंवा हरविलेल्या राज्यभरातील ३० हजार १७२ मुला-मुलींचा शोध घेण्यात राज्यातील पोलिसांना यश आले. गेल्या पाच वर्षांतील ही आकडेवारी असून, मुले सुखरूप परत मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ पसरली.

हरविलेल्या, बेपत्ता झालेल्या किंवा घरात कोणालाही न सांगता परस्पर निघून गेलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राज्य पोलीस दलातर्फे ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबवली जाते. त्यामध्ये विशिष्ट कालावधीत संबंधित पोलीस घटकात महत्त्वाच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशने, रेल्वे, बसस्थानके आदी गर्दीच्या जागी, अनोळखी, बेवारसपणे, भीक मागत आढळणाऱ्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली जाते. त्याचप्रमाणे राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात बेपत्ता, हरविलेल्यांबद्दल दाखल तक्रारींचे एकत्र संकलन करून संबंधित माहितीची त्या बालकांच्या माहितीशी शहानिशा केली जाते. त्यातून अनेक मुलांचा शाेध लावला जाताे.

* ११ हजार मुलींचा समावेश

महाराष्ट्रात १ जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत एकूण ८ वेळा ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम राबविण्यात आली. त्यातून एकूण ३०,१७२ मुला-मुलींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये एकूण १९,९९३ मुले, तर ११,०५९ मुली होत्या. त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या सुपुर्द करण्यात आले.

..........................