व्यसनमुक्तीसाठी ‘स्माइल’चे ‘येस टू लाइफ’
By admin | Published: October 14, 2016 06:57 AM2016-10-14T06:57:18+5:302016-10-14T06:57:18+5:30
समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी ‘स्माइल’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दोन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे
मुंबई : समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी ‘स्माइल’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दोन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. या दोघांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या ‘येस टू लाइफ’ पथनाट्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्व घटकांतील व्यक्तींमधील अमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्याचे ठरविले आहे.
‘स्माइल’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने बारावी इयत्तेत शिकणाऱ्या अनिसा टापिया आणि अमन नथानी या दोघांनी ‘येस टू लाइफ’ हे पथनाट्य साकारले. त्यात ‘स्माइल’ संस्थेतील २० लहान मुले व मुली अभिनय कौशल्य सादर करणार आहेत. हे पथनाट्य २० मिनिटांचे असून इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये आहे. या पथनाट्याचे पहिले सादरीकरण २४ सप्टेंबर, २०१६ रोजी कमला नेहरू उद्यान येथील अॅम्पिथिएटर येथे झाले. या पथनाट्यासाठी अमिषी सेठ यांनी मार्गदर्शन केले.
या पथनाट्याविषयी अनिसाने सांगितले की, मुख्यत: तरुण पिढीतील वाढणारे व्यसनाचे प्रमाण लक्षात घेऊन या पिढीला पथनाट्याद्वारे सतर्क करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता, विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसहित त्यांच्या पालकांनाही हे पथनाट्य दाखविण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पथनाट्याचे चित्रीकरण करून त्याचा माहितीपटही करण्यात आला आहे. लवकरच पालिका शाळा, खासगी शाळांमध्येही हा माहितीपट दाखविण्यात येईल. (प्रतिनिधी)