हुश्श... संपला ब्लॉक

By admin | Published: February 22, 2016 02:23 AM2016-02-22T02:23:21+5:302016-02-22T02:23:21+5:30

हार्बरवरील सीएसटीत बारा डब्यांच्या लोकलसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. हे काम अखेर २१ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात

Smiley ... ended block | हुश्श... संपला ब्लॉक

हुश्श... संपला ब्लॉक

Next

मुंबई : हार्बरवरील सीएसटीत बारा डब्यांच्या लोकलसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. हे काम अखेर २१ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आल्याने हार्बरवासीयांची अखेर ७२ तासांच्या ब्लॉककोंडीतून सुटका झाली. सीएसटीत पूर्ण केलेल्या सर्व कामानंतर आठवड्यातील पहिला कामाचा दिवस कोणताही बिघाड न होता व्यवस्थित जाईल, अशी हमी रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सीएसटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ची लांबी वाढविणे, रुळांचे क्रॉस ओव्हर बदलणे आणि ओव्हरहेड वायरसह अन्य काही तांत्रिक कामे एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) आणि मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आली होती. १९ फेब्रुवारीपूर्वी नऊ दिवस काही छोटी कामे मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण करण्यात आल्यानंतर १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत सलग ७२ तासांचा ब्लॉक महत्त्वाच्या कामांसाठी घेण्यात आला. या कामासाठी २0 आणि २१ फेब्रुवारी रोजी सीएसटी ते वडाळा दरम्यानची लोकल सेवा बंदही ठेवण्यात आली. त्याचा बराच मनस्ताप शनिवारी हार्बरवासीयांना सहन करावा लागला. शनिवारी मोठा मनस्ताप झाल्याने रविवारी हार्बरवासीयांनी प्रवास करणे टाळले. त्यामुळे हार्बरवरील स्थानकांवर फारशी गर्दी नव्हती.
रविवारी मध्यरात्री दीडपर्यंत सीएसटीतील बारा डब्यांच्या लोकलसाठी लागणारी कामे संपविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. परंतु बहुतांश कामे पूर्ण झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही कामे पूर्ण करण्यासाठी जवळपास ४00पेक्षा जास्त रेल्वे कामगार कार्यरत होते. काम पूर्ण करण्यात आल्यानंतर सोमवारपासून सुरू होणाऱ्या लोकल सेवांसाठी रूळ वाहतुकीसाठी पूर्ववत आहेत का याची चाचणीही घेण्यात येईल आणि त्यानंतर सकाळपासून लोकल धावण्यास सुरुवात होतील. हा ब्लॉक यशस्वी झाल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.
काही दिवस कसोटीचे
रुळांची, सिग्नल यंत्रणा तसेच ओव्हरहेड वायरची कामे सीएसटी हार्बरवर करण्यात आली आहेत. सोमवारपासून लोकल सेवा पूर्ववत सुरू राहील असा दावा रेल्वे अधिकारी करीत असले तरी पुढील काही
दिवस कसोटीचे असणार आहेत. (प्रतिनिधी)

हार्बरवरील प्रवास हवेशीर होणार
जुनाट लोकल, बंद असलेले पंखे आणि व्हेंटिलेशन,
त्यामुळे त्रासदायक प्रवास हार्बरवासियांनी बरीच वर्ष सहन केला. मात्र यातून हार्बरवासियांची सुटका होणार आहे. एप्रिल महिन्यापासून हार्बर मार्गावर बारा डबा लोकल धावतानाच यात सिमेन्स कंपनीच्या हवेशीर अशा लोकलचा समावेश असणार आहे. अशा सुरुवातीला पाच लोकल ताफ्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
हार्बर मार्गावर नऊ डबावरुन बारा डबा लोकल चालविल्या जाणार आहेत. त्याचे काम वेगाने केले जात असून मार्च महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल. हे काम पूर्ण करतानाच मार्च महिनाअखेरीपर्यंत डीसी (१,५00) ते एसी (२५000) परावर्तनही केले जाणार आहे. त्यामुळे एसी परावर्तनावर लोकल धावतानाच नविन लोकलही धावणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सिमेन्स कंपनीच्या बारा डबा लोकलही धावणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या बम्बार्डियर लोकलच्या बदल्यात या मार्गावरील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत. यातील बारा डब्याच्या पाच सिमेन्स लोकल मार्च अखेरपर्यंत मध्य रेल्वेला मिळाल्यानंतर एप्रिलपासून त्या हार्बरवासियांच्या सेवेत येतील, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या असणाऱ्या एका सिमेन्स लोकलबरोबर आणखी पाच सिमेन्स लोकलही येतील.

Web Title: Smiley ... ended block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.