Join us

स्मिता पाटीलचा 'मंथन' पुन्हा येणार सिनेमागृहांत; श्याम बेनेगलांच्या चित्रपटाची दिग्दर्शनाची जादू अनुभवता येणार

By संजय घावरे | Published: May 25, 2024 3:51 PM

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७७व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट आणि कलाकार-दिग्दर्शकांचे खूप कौतुक होत आहे.

संजय घावरे, मुंबई : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७७व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट आणि कलाकार-दिग्दर्शकांचे खूप कौतुक होत आहे. यात ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या 'मंथन' या गाजलेल्या चित्रपटाचाही समावेश आहे. जागतिक पातळीवर कौतुकाची थाप मिळाल्यावर 'मंथन' भारतीय सिनेमागृहांमध्ये पुर्नप्रदर्शित होणार आहे.

१९७६मध्ये प्रदर्शित झालेला स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह यांची मुख्य भूमिका असलेला 'मंथन' हा भारतीय क्लासिक सिनेमांमध्ये गणला जातो. या चित्रपटाचा प्रीमियर कान फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये करण्यात आला. तिथे या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. त्यानंतर 'मंथन'च्या पुर्नप्रदर्शनाची योजना आखण्यात आली आहे. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन आणि गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पीव्हीआर-आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये 'मंथन' प्रदर्शित होणार आहे. ५० शहरांमधील १०० सिनेमागृहांमध्ये १ आणि २ जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात डॉ. गिरीश कर्नाड, अमरिश पुरी, डॉ. मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा, अनंत नाग, अभा धुलिया आदी कलाकारांच्याही भूमिकात आहेत. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या चित्रपटाचे छायालेखन केले असून, संगीत दिग्दर्शन वनराज भाटियांनी केले आहे. पाच लाख शेतकऱ्यांच्या निधीतून बनलेला 'मंथन' हा लोकांनी लोकांसाठी बनवलेला चित्रपट आहे. गुजरातची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने दोन रुपये जमा केले होते. 

फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे संचालक शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा फिल्म हेरिटेज फाऊंडेशन एखाद्या चित्रपटाच्या पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेते, तेव्हा तो ज्यांच्यासाठी बनवला गेला होता त्या लोकांसमोर आणण्याचे काम करते. हा पुनर्संचयित चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :स्मिता पाटीलकान्स फिल्म फेस्टिवल