मुंबई-
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आज ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होत आहे. मुंबईत आत शिवसेनेचे चक्क दोन दसरा मेळावे होत आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा, तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात शिंदे गटाकडून मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना आज आणखी एका मोठा धक्का देण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. यात दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. याची चर्चा सुरू असतानाच आता थेट ठाकरे कुटुंबातील सदस्यच आती बीकेसीच्या मेळाव्याला पोहोचला आहे.
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई स्मिता ठाकरे नुकत्याच बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात पोहोचल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी आयोजित केलेल्या मेळाव्याला त्या उपस्थित आहेत. यामुळे आता ठाकरे कुटुंबातीलच सदस्यानं अशाप्रकारे शिंदेंना उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही स्मिता ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. यावेळी शिंदेंची केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचं स्मिता ठाकरे म्हणाल्या होत्या. पण आज थेट राजकीय व्यासपीठावर स्मित ठाकरे आल्यामुळे शिंदेंनी मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.
"मी इथं आले आणि मला इथं सगळे जुने चेहेरे दिसताहेत. हे पाहून आनंद झाला आहे. एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता आम्हाला आहे. त्यांना ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. दुसऱ्या मेळाव्यांचं आम्हाला काही माहित नाही. आम्ही इथं आहोत त्यामुळे इथं काय होईल यातच आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे", असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.
कोण आहेत स्मिता ठाकरे?१९९९ साली शिवसेनेची सत्ता गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षात अंतर्गत दोन गट दिसू लागले होते. एक गट राज ठाकरेंना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत असे आणि दुसरा उद्धव ठाकरेंना. मात्र, या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती शिवसेनेची धुरा हाती घेण्याच्या स्पर्धेत होती. ती व्यक्ती म्हणजे स्मिता ठाकरे. लेखक वैभव पुरंदरे यांनी 'बाळ ठाकरे अँड द राईज ऑफ द शिवसेना' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. स्मिता ठाकरे काहीकाळ राजकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. पुढे उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' आणि शिवसेनेत वजन वाढत गेलं. पर्यायानं स्मिता ठाकरे स्पर्धेतून बाहेर पडल्या. राज ठाकरे तर पुढे शिवसेनेतूनच बाहेर पडले आणि नवा पक्ष स्थापन केला.
शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव...
स्मिता ठाकरे यांना थेट बाळासाहेबांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं होतं. अनेकदा त्यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या चित्रपटसृष्टीत कायम आपलं वजन राखून राहिलं, चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. आजही काही ना काही निमित्तानं स्मिता ठाकरेंची चर्चा होत राहतेच. स्मिता ठाकरे या पूर्वाश्रमीच्या स्मिता चित्रे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी 1987 साली विवाहानंतर त्या 'मातोश्री'च्या सूनबाई झाल्या. स्मिता ठाकरे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असत. काही कारणानिमित्त जयदेव ठाकरे यांच्याशी ओळख झाली आणि ती वाढून पुढे त्यांचं लग्न झालं. ठाकरे घरण्याची सून झाल्यानंतर स्मिता ठाकरे यांचा काही प्रसंगी राजकीय वावरही पाहायला मिळाला होता. ठाण्यातील एका जिमच्या उदघाटनाला त्या बाळासाहेबांसोबत उपस्थित होत्या. तसंच स्मिता ठाकरे यांच्या शब्दालाही शिवसेनेत वजन होतं. पण पुढे जाऊन उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सुत्र एकवटली गेली.