मुंबई: मुंबईतील वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अर्थसंकल्पात पालिकेने ‘ॲक्शन प्लॅन’ देण्यात आला आणि स्मॉग टॉवर्सच्या वायूप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आणला होता. मात्र, स्मॉग टॉवर्सच्या प्लॅनची अंमलबजावणी होण्याआधीच पालिकेकडून तो स्क्रॅप करण्यात आला आहे. दिल्लीतील ‘स्मॉग टॉवर्स’चा प्रयोग फसल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अभ्यास समितीकडून स्मॉग टॉवर्सच्या किंवा हवा शुद्धीकरण यंत्रणेवर मर्यादा येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावत आहे. नियंत्रण मिळवण्याकरिता दिल्लीप्रमाणे स्मॉग टॉवर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस आणि आनंद विहार इथे प्रयोग करण्यात आला असून त्याचा खर्च २० कोटी रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी ही पद्धत कामी आली नसली तरी वर्दळीच्या ठिकाणावरील हवेचा दर्जा चांगला राखण्यासाठी पालिकेने स्मॉग टॉवर्स बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्याला फुल्ल स्टॉप मिळाला आहे.
स्मॉग टॉवर म्हणजे काय ?स्मॉग टॉवर एक नियंत्रण यंत्र आहे, जे यंत्राच्या हवा काही प्रमाणात शुद्ध करू शकते. यंत्र लावलेल्या भोवतालची प्रदूषित हवा यात शोषली जाते आणि शुद्ध हवा त्यातून बाहेर सोडली जाते. हवेतील धूलिकण, विषारी वायू प्रदूषित हवेतून वेगळे होऊन शुद्ध हवा बाहेर पडते.
शिवाजी पार्कात स्मॉग टॉवर उभारणार का ?शिवाजी पार्क परिसरातील वायू प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी येथे स्मॉग टॉवर लावण्याची संकल्पना खा. राहुल शेवाळे यांनी मांडली असून त्याला महानगरपालिका आयुक्तांनी प्राथमिक मंजुरी दिली आहे. पालिकेच्या मिळालेल्या लाल झेंड्यानंतर शिवाजी पार्कात टॉवर उभा राहणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या अहवालात काय ?
राष्ट्रीय हरित लवादाच्या मागील आठवड्यातील अहवालानुसार, ही यंत्रणा खूपच खर्चिक असून प्रदूषण नियंत्रणासाठी कमी गुणवत्तेची आणि कुचकामी ठरत आहे. १०० मीटरच्या परिसरात स्मॉग टॉवरकडून केवळ १७ टक्के प्रदूषण कमी होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पालिकेची अभ्यास समिती दिल्लीच्या दौऱ्यावर असतांना स्मॉग टॉवर वायू प्रदूषणासाठी तर प्रभावी नाहीच उलट त्यातील एका स्मॉग टॉवरच्या आवाजामुळे तेथे ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यामुळे पालिकेकडून सद्यस्थितीत तरी स्मॉग टॉवर यंत्रणेचा प्लॅन रद्द करण्यात आला आहे.