मुंबई : मानखुर्द पूर्व येथील मानखुर्द मंडालामधील भंगार साहित्याला शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीने संपुर्ण पूर्व उपनगर आगीच्या धूरात लोटले होते. दुर्घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेली मोठी लोकवस्ती आणि लगतच्या परिसरातून वाहणा-या रस्त्यांहून दुर्घटनास्थळी लागलेल्या आगीच्या ज्वाला आणि परिसरात पसरणारा धूर दूरवरून दिसत होता. आसपासच्या परिसरात आगीचा धूर पसरल्याने येथील बहुतांशी परिसरत काळोखात गेल्याचे चित्र होते.
येथील आगीची माहिती मिळताच मुंबईअग्निशमन दलाकडून दुर्घटनास्थळी १३ फायर इंजिन धाडण्यात आले. शिवाय ३ फायर टँकर, ११ जेटी आणि रुग्णवाहिका धाडण्यात आली. या व्यतीरिक्त आग शमविण्यात पाण्याची अडचण येऊ नये म्हणून छेडा नगर, देवनार आणि घाटकोपर येथील फिलिंग पाइंटसची मदत घेण्यात आली. दुपारी लागलेली आग सायंकाळीदेखील धुमसूतच होती. मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, कुर्ला येथील परिसरातून आगीच्या धूराचे लोट दिसत होते. आगीचा धूर लगतच्या परिसरात पसरल्याने दुपारसह सायंकाळी येथील परिसर काळवंडला होता. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर भंगारची गोदामे आहेत. शिवाय लगतच डम्पिंग ग्राऊंडदेखील आहे. यापूर्वी डम्पिंग ग्राऊंडला मोठया प्रमाणावर आगी लागल्या असून, भंगारच्या गोदामांनादेखील मोठया आगी लागल्या आहेत. या दुर्घटनांत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दरम्यान, मानखुर्द येथील आग रात्री ऊशिरापर्यंत शमविण्याचे काम सुरु होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.