Join us

मुंबई पुन्हा अदृश्य; सलग दुसऱ्या दिवशी धुरक्याचे साम्राज्य, दृश्यमानता घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:20 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने घसरत आहे.

मुंबई : मुंबई आणि परिसरात प्रदूषणाने टोक गाठले असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे साम्राज्य कायम होते. धुरक्याचा प्रभाव इतका तीव्र होता की, अगदी २००-३०० मीटर अंतरावरील वाहने, इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या. बोरिवली, मालाड, नेव्ही नगर, माझगाव, देवनार येथील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा अतिवाईट श्रेणीत गणली गेली. 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने घसरत आहे. धूळ आणि धुरके यांच्या मिश्रणामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्याची प्रचिती सलग दोन दिवसांपासून येत आहे. शुक्रवारी पूर्व आणि पश्चिम उपनगरांत दुपारी धुरक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली होती. एका महिन्यातील साधारण १० ते १५ दिवस ‘वाईट’ हवेची नोंद झाली, तर काही दिवस सलग ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली आहे. 

येथील हवा निर्देशांक हा नोव्हेंबर महिन्यापासून २०० ते ३०० पर्यंत नोंदविला जात आहे. वारे वाहते नसल्याने प्रदूषके साचून राहत असल्याचा परिणाम मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत आहे. 

हवामानाचा दर्जा कुठे किती आणि कसा?

मालाड    २६६    वाईटबोरिवली    २०९    वाईटनेव्हीनगर    २७०    वाईटमाझगाव    २०९    वाईटदेवनार    २०१    वाईट

टॅग्स :मुंबईवायू प्रदूषणमुंबई महानगरपालिका