भारतात ६.२५ लाख मुले करतात रोज धूम्रपान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:31 AM2018-05-31T02:31:25+5:302018-05-31T02:31:25+5:30
भारतात ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करतात, असे टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालात समोर आले आहे.
मुंबई : भारतात ६.२५ लाख मुले दररोज धूम्रपान करतात, असे टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालात समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, तंबाखू व सिगारेट सर्वत्र सहजपणे व स्वस्त उपलब्ध होत असतात. धूम्रपानामुळे देशाचे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते. यात आरोग्य सुधारण्यावर झालेला थेट खर्च आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे होणाऱ्या अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे.
जगभरात ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. जगभरात तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी ७० लाख जणांचा मृत्यू होतो. यातील १० लाख जण विकसनशील देशांतील असतात. भारतात दर सहा सेकंदांनी एकजण तंबाखूच्या सेवनामुळे होणाºया रोगांना बळी पडतो. प्रौढांच्या तंबाखू सेवनाविषयीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण प्रचंड आहे. भारतात २७.५ कोटी प्रौढ व्यक्ती, म्हणजे एकूण ३५ टक्के लोकसंख्या, तंबाखूचे सेवन कोणत्या तरी प्रकाराने करीत असते. ही संख्या वाढतच चालली आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकार, पक्षघात, फुप्फुसाचे रोग, महिलांच्या गरोदरपणात समस्या, तसेच अनेक प्रकारचे कर्करोग होत असतात. सध्याची परिस्थिती व आकडेवारी पाहता, धूम्रपान करणाºयांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत. मुलांनाही ही घातक सवय पटकन लागलेली दिसते. लहान मुले, तरुण-तरुणी यांना या घातक सवयीपासून दूर ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवेत. भारतात धूम्रपान व तंबाखूसेवनाच्या विरोधात मोहिमा निघाल्या नाहीत, असे नाही. या मोहिमांमुळे परिस्थितीत काही बदल होऊन तंबाखू सेवनाचे प्रमाण काही टक्क्यांनी कमीही झाले आहे. २००९ मध्ये हे प्रमाण ३४.६ टक्के होते, ते २०१७ मध्ये २८.६ टक्के झाले आहे. अर्थात, तरीदेखील तंबाखूसेवनाचा धोका सार्वजनिक आरोग्याला तितक्याच प्रमाणात आहे.
केवळ सिगरेटच नव्हे, तर इतरही तंबाखूजन्य पदार्थही या करातून सरकारने वगळायला नकोत, तसेच सिगारेटविरोधी मोहिमांमध्ये सहभागी होणाºया स्वयंसेवी संघटनांनी सरकारी योजनाही राबविण्यास मदत केली पाहिजे. विशेषत: धूम्रपानाचे अप्रत्यक्षपणे वाईट परिणाम भोगणाºयांसाठी काही काम करायला हवे. एकंदरीत, आरोग्यविषयक संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक गट व स्वयंसेवी संघटना या सर्वांनी सरकारच्या मदतीने देशाच्या खांद्यावरील तंबाखूचे हे जड ओझे फेकून द्यायला हवे, असे मत वोक्हार्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्त डॉ. हुझैफा खोराकीवाला यांनी व्यक्त केले.
सरकारने व्यसनमुक्तीकडे पाऊल उचलावे
मुंबई : २०२० साली महाराष्ट्राला ६० वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने सरकारने संपूर्ण राज्याला व्यसनमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याचे आवाहन विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत केले. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळासह विविध स्वयंसेवी संस्थांनी बुधवारी दुपारी सीएसएमटी येथे पथनाट्य आणि अभियान राबविले. या वेळी राज्य सरकारने नशामुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाºयानुसार तंबाखूचे सेवन असेच भविष्यात सुरू राहिले, तर २०३० पर्यंत जगातील सुमारे १०० कोटी लोक तंबाखूमुळे होणाºया रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये २० ते ३० वर्षे वयोगटांतील तरुणांची संख्या ४० टक्क्यांइतकी असेल. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला आहे. महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम २०११ साली व्यसनमुक्तीचे धोरण बनविले आहे. २०२० साली महाराष्ट्राला ६०वे वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने सरकारने व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, तंबाखूचे व्यसन करणार नसल्याची शपथ घेत, ‘तंबाखू मतलब खल्लास’चा संकल्प केला.