धुरामुळे घुसमट कायम...
By admin | Published: January 31, 2016 03:02 AM2016-01-31T03:02:10+5:302016-01-31T03:02:10+5:30
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेली आग अद्याप धुमसत असून, यामुळे निघणारा धूर आता उपनगरासह शहरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. या धुराचा अबालवृद्धांना
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लागलेली आग अद्याप धुमसत असून, यामुळे निघणारा धूर आता उपनगरासह शहरातील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. या धुराचा अबालवृद्धांना प्रचंड त्रास होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, प्रदूषणात आणखीनच भर पडून आरोग्याशी निगडित विकार बळावण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आगीच्या धुराचे लोट पूर्व-पश्चिम उपनगर आणि शहरातील वातावरणातही मिसळल्याने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आग विझविण्यासाठी घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त प्रकाश पाटील, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून, आयुक्त अजय मेहता हे या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख हे स्वत: महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीबाबत यथायोग्य समन्वयाची कार्यवाही करीत आहेत. सर्व अग्निशमनविषयक बाबींचे सुयोग्य समन्वयन करण्यासाठी घटनास्थळी अत्याधुनिक यंत्रसामग्री व संवाद यंत्रणेसह सुसज्ज अद्ययावत वाहनात अतिरिक्त व विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यकता भासल्यास तातडीने श्वसन उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी श्वसन उपकरण वाहन तैनात करण्यात आले आहे. या एका वाहनात श्वसन उपकरणांचे २२ संच उपलब्ध आहेत.
डम्पिंग प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन
स्मार्ट सिटीच्या बाता मारण्याऐवजी देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निकाली लावा. अन्यथा पंधरा दिवसांनंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारासमोर देवनार परिसरातील रहिवासी आणि शालेय विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.
देवनारसह मुलुंड डम्पिंगची कचरा सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी आता पर्यायी जागा शोधण्याची गरज आहे. विशेषत: हे माहीत असूनही महापालिका याबाबत काहीच हालचाल करत नाही, हे संतापजनक आहे, असेही अहिर यांनी म्हटले आहे.
घटनास्थळावरील फौजफाटा
१४ फायर इंजीन : प्रत्येकी ४,५००
लीटर पाणी साठवण क्षमता असणारे १४ फायर इंजीन
८ वॉटर टँकर : १२ ते १८ हजार लीटर एवढी पाणी साठवण क्षमता असणारे ८ वॉटर टँकर
२ आपत्कालीन रुग्णवाहिका : डॉक्टर्स व चमूसह २ अद्ययावत आपत्कालीन रुग्णवाहिका
१ अतिरिक्त रुग्णवाहिका : १ सर्वसाधारण अतिरिक्त रुग्णवाहिका
धुरामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये खोकला आणि घसादुखीसारखे आजार बळावले आहेत. तसेच अस्थमाच्या रुग्णांनाही श्वास घेणे कठीण झाले आहे. सतत धुराचे वातावरण असल्याने औषधेही परिणामकारक ठरत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
देवनार हे देशातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड आहे. २ हजार १२० हेक्टरवर पसरलेल्या या डम्पिंग ग्राउंडची मर्यादा संपली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने येथे कचऱ्याचे ३५ मीटरहून अधिक उंचीचे डोंगर उभे राहिले आहेत.
कचऱ्याची रासायनिक अभिक्रिया होऊन अनेकदा आगी लागतात, असे महापालिका म्हणते. मात्र आग लागल्यानंतर ती लवकर विझली नाही तर परिसरात धूर पसरतो आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्याकरिता मिनी वॉटर टँकरचा वापर केला जात आहे. शिवाय प्रत्येकी १ हजार लीटर पाणी साठवण क्षमता असणारे २ मिनी वॉटर टँकर घटनास्थळी तैनात आहेत. आग विझविण्यासाठी एवढा मोठा फौजफाटा असूनही येथून निघणारा धूर परिसरात पसरल्याने प्रदूषणाच्या समस्येत भरच पडली आहे.