मुंबई - देवनार पोलिसांनी, ३७ किलोच्या गांजा तस्करीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचा मुंबई उपाध्यक्ष सोहेल सय्यद उर्फ सुनील निकमसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात निकमच्या तिघा नातेवाइकांचाही समावेश आहे. या गुन्ह्यांत सय्यदने त्याच्या स्कॉर्पिओ कारचा वापर केला होता. या कारमधून २ किलो गांजा, तर त्याच्या भाड्याने घेतलेल्या घराच्या झडतीत ३५ किलो गांजा सापडला. तेथूनच उर्वरित चार जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदने देवनारच्या केना मार्केटमध्ये भाड्याने घेतलेल्या घरातून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने शनिवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा एका अल्पवयीन मुलासह पाच जण प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये गांजा भरताना आढळले. अल्पवयीन मुलासह बाळा पाचारी, सुलतान सय्यद, शहजाद सय्यद, शफीक सय्यद यांना पोलिसांना बेड्या ठोकल्या. तेथून तब्बल३५ किलोचा गांजा जप्त करण्यात आला.त्यानंतर, सय्यदलाही बेड्या ठोकल्या. त्याच्या स्कॉर्पिओमधून २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. राजकीय पक्षाचा नावाखाली सय्यदच्या या करतुती सुरू होत्या. यात आणखी काही बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुख्य सूत्रधार सय्यदकडून एकूण ३७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गांजा तस्करी; राष्ट्रवादीचा नेता अटकेत, देवनारमधून ३७ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:07 AM