Join us

तस्करी करणाऱ्याला अटक

By admin | Published: January 12, 2017 6:24 AM

सीबीडी परिसरामध्ये एमडी पावडर (मेथाफेटामाईन) विक्री करण्यासाठी आलेल्या बिलाल उर्फ सलमान अब्दुल

नवी मुंबई : सीबीडी परिसरामध्ये एमडी पावडर (मेथाफेटामाईन) विक्री करण्यासाठी आलेल्या बिलाल उर्फ सलमान अब्दुल रज्जाक पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किमतीची ५३ ग्रॅम पावडर जप्त केली असून वर्षभरातील पथकाची ही तिसरी कारवाई आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जून २०१६मध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी पथकाची निर्मिती केली. नवी मुंबईमधून अमली पदार्थांची पायमुळे उखडून टाकण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यावर सोपविली आहेत. गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सहा महिन्यांमध्ये तब्बल २५ गुन्हे दाखल केले असून ३७ आरोपी गजाआड केले आहेत. १० जानेवारीला सायंकाळी एक तरुण मेथाफेटामाईन हे घातक अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर आयुक्त, सहआयुक्त व उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राणी काळे व अमित शेलार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक संशयित तरुण सेक्टर १५मधील लक्ष्मी हॉटेल जवळ फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ५३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेला आरोपी बिलाल उर्फ सलमान अब्दुल रज्जाक पटेल हा तळोजामधील मन्नान कॉलनी परिसरात राहणारा आहे. त्याच्याकडे तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीची एमडी पावडर सापडली आहे. त्याला अटक करून बुधवारी सीबीडी कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने एमडी पावडर कोठून आणली. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राणी काळे करत आहेत. या कारवाईमध्ये रवींद्र राऊत, कासम पिरजादे, मनोज जाधव, सचिन भालेराव, अश्विनी चिपळुणकर, राजेश गाढवे, महेश गवळी, राहुल कर्डीले, सुप्रिया ठाकूर, अमोल गोगरे, आकाश मुके, सांगोळकर यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)कुख्यात तस्कर  पूनम गजाआड नवीन वर्षामध्ये अमली पदार्थविरोधी पथकाचा कारवाईचा धडाका सुरू आहे. पहिल्या आठवड्यात पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार व पथकाने कुख्यात तस्कर पूनम वाझला अटक करून तिच्याकडून १ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा व १०० ग्रॅम चरस जप्त केले होते. मागील वर्षभरामध्ये पहिल्यांदाच चरस हस्तगत करण्यात आले. नेरूळमध्ये गांजा जप्त  अमली पदार्थविरोधी पथकाने दुसऱ्या आठवड्यात नेरूळमधील बालाजी टेकडीच्या पायथ्याशी रामकृष्ण दास या तरूणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांच्या धाडसत्रामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.