शॅम्पूच्या बाटलीतून कोकेनची तस्करी! विमानतळावर पकडले १५ कोटींचे कोकेन, डीआरआयची कारवाई
By मनोज गडनीस | Published: December 29, 2023 06:47 PM2023-12-29T18:47:27+5:302023-12-29T18:47:41+5:30
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश करत तिला अटक केली आहे.
मुंबई - केनियातून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एका महिलेकडे असलेल्या सामानातील शॅम्पू व बॉडी वॉशच्या बाटल्यातून चक्क कोकेनची तस्करी झाल्याची घटना उजेडात आली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश करत तिला अटक केली आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १४ कोटी ९० लाख रुपये आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबरच्या रात्री केनियावरून मुंबईत येणाऱ्या केक्यू - २०४ या विमानाने येणाऱ्या एका केनियन महिलेमार्फत अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. हे विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी तिला बाजूला घेत तिची चौकशी केली. तिच्या सामानाची झडती घेतली असता शॅम्पू व बॉडी वॉशच्या बाटल्यांमध्ये दोन काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या असल्याचे आढळून आले. त्या पिशव्यांमध्ये कोकेन असल्याचे तपासांती आढळून आले. या कोकेनचे एकूण वजन १४९० ग्रॅम इतके आहे.