८० ब्लॉट्स जप्त; एनसीबीची सांताक्रूझमध्ये कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाची (एनसीबी) मादक द्रव्याच्या विक्री व तस्करीबद्दल कारवाई सुरू आहे. सोमवारी रात्री सांताक्रुझ परिसरातून एलसीडीचे ८० ब्लॉट्स जप्त करण्यात आले. अडॉल्फ हिटलरच्या जीवनचरित्रावरील पुस्तकात घालून त्याची विक्री करण्यात येत होती.
विलेपार्ले येथील एका टपाल कार्यालयात हे पार्सल पाठविण्यात आले होते. ज्याने ते पाठविले त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
डार्कनेटच्या माध्यमातून एलएसडीची तरुणांना विक्री केली जात असून, त्यासाठीची बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीचा वापर केला जात आहे. त्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. एलएसडी प्रामुख्याने युरोपियन देशातून आयात केले जाते.
दरम्यान, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक राजिक चिकना याला एनसीबीने समन्स पाठविले आहेत. चिकनाचा भाऊ दानिश चिकनाला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिश दाऊदची डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना चालवित होता.
................................