मिक्सरच्या भांड्यातून अडीच कोटीच्या सोन्याची तस्करी- चौघांना अटक, ईडीची कारवाई
By मनोज गडनीस | Published: January 17, 2024 04:51 PM2024-01-17T16:51:49+5:302024-01-17T16:52:01+5:30
या चार किलो सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ५८ लाख रुपये इतकी आहे.
मुंबई - अंर्तवस्त्र आणि मिक्सरच्या भांड्यातून चार किलो सोने लपवून आणणाऱ्या दोन लोकांना केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी (डीआरआय) मुंबई विमानतळावर अटक केली आहे. तसेच, तस्करीच्या माध्यमातून आलेले हे सोने स्वीकारण्यासाठी मुंबई विमानतळाबाहेर प्रतीक्षा करणाऱ्या त्यांच्या दोन साथीदारांना देखील डीआरआयने अटक केली आहे. या चार किलो सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ५८ लाख रुपये इतकी आहे.
डीआरआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील जेद्दा येथून येणाऱ्या एका विमानाद्वारे सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना बाजूला घेत त्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली. प्रथम या दोघांची वैयक्तिक झडती घेतली असता त्यांच्या अंर्तवस्त्रामध्ये प्रत्येकी एकेक किलो मेणासदृष्य गोठवलेली सोन्याच्या पावडरींची पाकिटे आढळून आली.
तर, त्यांच्याकडे असलेल्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेली तीन मिक्सरची भांडी जास्त जड वाटल्याने अधिकाऱ्यांनी ती फोडली व त्यात आणखी दोन किलो सोने दडविल्याचे आढळून आले. यानंतर या दोघांना अटक करत त्यांची चौकशी केली असता हे सोने स्वीकारण्यासाठी विमानतळा बाहेर दोन लोक आल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत त्या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.