मुसळधार पावसात 'साप' आणि 'अजगराची' लपाछुपी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:05 AM2021-07-24T04:05:59+5:302021-07-24T04:05:59+5:30
मुंबई : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने धिंगाणा घातला आहे. लोकांच्या घरांत, गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने आधीच त्यांची झोप उडाली ...
मुंबई : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने धिंगाणा घातला आहे. लोकांच्या घरांत, गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने आधीच त्यांची झोप उडाली आहे. त्यातच आता साप आणि अजगरांची लपाछुपी यात सुरू झाली असून गेल्या तीन दिवसांत जवळपास ५ मोठे अजगर व १८ सापांची सुटका प्राणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
प्राणी संघटना सर्प इंडिया यांनी गेल्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्गसह राज्यातून या जनावरांची सुटका केली आहे. पावसाच्या पाण्यात वाहून येणारे साप आणि अजगर कोणाच्या स्वयंपाक घरात, तर कोणाच्या कार बोनेट, रिक्षामध्ये लपून बसले होते. नागरिकांनी कोणत्याही मोठ्या सापाला अथवा अजगराला पाहिले की घाबरून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार या संघटनेने अशा ५ अजगरांसह १८ सापांची सुखरूप सुटका करत त्यांना जंगलात सोडून दिल्याचे या संघटनेच्या व्यवस्थापन प्रमुख चित्रा पेडणेकर यांनी सांगितले.
घरात साप किंवा अजगर शिरल्याच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे येत आहेत. पुराच्या पाण्यात वाहून येणारे हे प्राणी राहती घरे किंवा वाहनांमध्ये आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असे जनावर आढळल्यास घाबरून त्यांना जिवे मारण्यास न जाता महाराष्ट्र वनविभागाचा हेल्पलाईन क्रमांक १९२६ अथवा ९८२११३४०५६ किंवा ७६६६९९३३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.