महिला पोलीस अंमलदाराला सर्पदंश; पोलिसांमध्ये सापाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 08:24 AM2021-11-21T08:24:36+5:302021-11-21T08:25:06+5:30
मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला. शुक्रवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी खिडकीतून हात धुवत असताना साप चावला. त्यांनी या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली.
नालासोपारा : पोलीस ठाण्यात तैनात असणाऱ्या ३० वर्षीय महिला पोलीस अंमलदाराला शुक्रवारी दुपारी सर्पदंशाची घटना झाल्याचे उघडकीस आले. खिडकीतून हात धुवत असताना हा साप चावल्याचे बोलले जात आहे. पण नेमका कोणत्या जातीचा साप चावला, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.
मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला. शुक्रवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी खिडकीतून हात धुवत असताना साप चावला. त्यांनी या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली. इतर पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत व्यवस्थित असून उपचार सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पोलिसांमध्ये सापाची भीती
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला असलेले गवत आणि जप्त वाहनांच्या आत साप लपून बसल्याचे अनेक वेळा पोलिसांनी पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मुद्देमाल कक्षात नाग दिसल्यावर अग्निशामक दलाला बोलावल्यावर त्यांनी नागाला पकडून नेले. याआधीही दोन ते ते तीन वेळा पोलीस ठाण्यात सापाला पाहण्यात आले आहे. यामुळे पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला पोलिसाला साप चावल्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला शनिवारी औषध फवारणी केल्याचे कळते.