एसएनडीटी महिला विद्यापीठाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:56 AM2019-06-06T01:56:12+5:302019-06-06T01:56:17+5:30

जुहू-तारा नाल्यावरील पूलबंदीमुळे वाहनांना लागणारा पाच किमीचा वळसा वाचणार

SNDT Women's University's road is open for traffic | एसएनडीटी महिला विद्यापीठाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा रस्ता वाहतुकीसाठी खुला

Next

मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपल्या अंतर्गत रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे वाहतुकीसाठी मदत होणार असून प्रवाशांचा जुहू-तारा नाल्यावरील पूलबंदीमुळे वाहनांना घ्यावा लागणारा तब्बल पाच किमीचा वळसा वाचणार आहे. पालिका प्रशासनासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत काही अटी व शर्तींच्या आधारे ही परवानगी विद्यापीठाने दिली आहे.
विद्यापीठाच्या अटी-शर्तींमध्ये जुहू-तारा रोडवरील पूल दुरुस्त होईपर्यंत अवजड ट्रक, टेम्पो, बस ही जड वाहने वगळून एसएनडीटी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल असे नमूद करण्यात आले आहे.

वाहने विद्यापीठाच्या रिलीफ रोडवरील प्रवेशद्वारातून बाहेर पडतील किंवा दोन्ही मार्गाने मार्गस्थ होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. एसएनडीटी हे महिला विद्यापीठ असून येथे सुमारे पाच हजार मुली शिक्षण घेतात, तसेच ३५० मुली वसतिगृहात राहतात. त्यामुळे विद्यापीठ व वसतिगृहाचा परिसर सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याच पार्श्वभूमीवर पूल दुरुस्ती होईपर्यंत मुलींच्या वसतिगृहाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची एक बीट चौकी व कुलगुरूंच्या कार्यालयाजवळ वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात यावी. आवारातील छोट्या मैदानाजवळून प्रवेश रोखण्यासाठी कॅनरा बँकेच्या एटीएमपासून रिलीफ रोडवरील गेटपर्यंत तात्पुरते कुंपण उभारावे, कॅमेरे बसवावेत, काही दुर्घटना घडल्यास पालिकेने जबाबदारी घ्यावी, अशा अटी प्रशासनाने घातल्या आहेत.

एसएनडीटी विद्यापीठासमोरील जुहू तारा रोड येथील नाल्यावरील पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे सोमवारी दुपारपासून अचानक पादचारी व वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला. हा पूल १९७५ मध्ये बांधला असून पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये तो धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणतीही पूर्वसूचना न देता हा पूल बंद करण्यात आल्यामुळे सोमवार, मंगळवारी या परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. या पुलावरून सांताक्रुझ, खार व वांद्रे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना व्ही. एम. रोड, एस. व्ही. रोड या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार होता. मात्र त्यामुळे चार ते पाच किमीचा अतिरिक्त फेरा पडणार होता.

पूलबंदीमुळे नागरिकांचा रोष वाढू लागल्यानंतर या भागातील भाजपचे आमदार अमित साटम व भाजपचे नगरसेवक अनिष मकवानी यांनी एएसएनडीटी विद्यापीठ प्रशासनाला त्यांचा अंतर्गत रस्ता वाहतुकीसाठी वापरू देण्याची विनंती केली. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने अखेर विद्यापीठाचा अंतर्गत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Web Title: SNDT Women's University's road is open for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.