Join us  

सर्जरी पलीकडची इनिंग संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 9:39 AM

कधीही पेशंटवरती रागावणे नाही, कधीही नातेवाइकांवरती चिडणे नाही, पण त्यांच्या शिस्तप्रियतेमध्ये कधीही कमतरता नव्हती. 

डॉ. संजय ओक, माजी अधिष्ठाता,  केईएम रुग्णालय

आज देशमुख मॅडम गेल्या. माझ्यासाठी म्हणाल तर ८ ऑगस्ट १९८६ पासून सुरू झालेल्या एका ऋणानुबंधाला पूर्णविराम मिळाला. समाजासाठी त्या मोठ्या सर्जन, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू, भारत सरकारच्या असंख्य योजनांच्या आणि समितीच्या सदस्य आणि खूप काही होत्या, पण माझ्यासाठी मात्र ती खऱ्या अर्थाने माझी गुरुमाता होती. त्यांनी मला पहिल्यांदा पाहिले छत्रपती संभाजीनगरच्या एका सर्जरी कॉन्फरसमध्ये, माझे भाषण ऐकले. ५० रुपयांची एक नोट मला काढून दिली आणि पुढच्या आठवड्यात मला एक छोटे पत्र  लिहिले. एमएसनंतर पुढे शिकायचे असेल तर मुंबईला मला येऊन भेट. 

त्या पत्राचा आधार घेऊन १९८६ साली मी केईएम रुग्णालय शोधत मुंबईत आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत एक मुंबईकर झालो. स्नेहलता देशमुख या एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व होत्या. त्या जितक्या चांगल्या सर्जन होत्या, त्याहून कितीतरी उत्तम अशा एक माणूस होत्या. कधीही पेशंटवरती रागावणे नाही, कधीही नातेवाइकांवरती चिडणे नाही, पण त्यांच्या शिस्तप्रियतेमध्ये कधीही कमतरता नव्हती. 

त्यांचे पाठांतर अफाट होते आणि अचूक कविता योग्य त्या वेळेला स्टेजवर म्हणणे हेही त्यांना शक्य होते. भाषणे लिहिलेली नसायची, पण उत्स्फूर्तपणे मॅडम जनमानसाची नस पकडण्यामध्ये अत्यंत वाकबगार होत्या. अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. आज त्या आम्हाला पोरके करून गेल्या. मॅडम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याबरोबर असतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

उत्तम योजनाकार आणि कल्पक 

दिवसाची सुरुवात स्वतःच्या पर्समधून किल्ली काढून ऑफिस उघडून करणाऱ्या आमच्या मॅडम. साडेचार-पाचची वेळ संपल्याशिवाय त्या कधीही घरी गेल्या नाहीत. रोज सकाळी ऑपरेशन्स, दुपारी असंख्य मीटिंग्ज आणि त्यानंतर दर शनिवारी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा घेतलेला वसा त्यांनी कधीही सोडला नाही. 

१९९०-९१ मध्ये त्या शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि १९९५-९६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झाल्या आणि तिथून त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्जरी पलीकडची इनिंग खेळली, असे मला वाटते. 

त्या उत्तम योजनाकार, कल्पक होत्या. एखादी गोष्ट करायची म्हटले की, त्या स्वतः राबायच्या, साहजिकच त्यांच्या आजूबाजूचा माणूस हे घरचेच काम आहे, असे समजून त्यांच्यासोबत राबायचा. मॅडमचे सर्व कुटुंब आणि जवळजवळ ३० वर्षांतील त्यांचे विद्यार्थी हे एक एकसंध घटक होते. 

अगदी गेल्यावर्षीपर्यंत असा एकही गणपती गेला नाही की, आम्ही गणपतीला मॅडमच्या घरी गेलो नाही. मॅडम ३०-३० वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे, त्याच्या बायकोचं, त्याच्या मुलांचे नाव लक्षात ठेवायच्या. एवढी मोठी सर्जन; परंतु घरातील एकही व्रत, सणवारात त्या मागे नसायच्या. देशमुख कुटुंबीयांचा संपूर्ण विस्तारित परिवार, प्रत्येकाचे दुखणेखुपणे, हे शेवटी मॅडमच्या दरबारामध्ये सादर केले जायचे आणि मग त्या दुखण्यावर मॅडम स्वतः इलाज करायच्या. 

टॅग्स :मुंबई