उत्तरेकडे बर्फ पडणार; मुंबईकरांना थंडी भरणार
By सचिन लुंगसे | Published: February 3, 2024 06:19 PM2024-02-03T18:19:59+5:302024-02-03T18:20:10+5:30
उत्तर भारतात पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई: उत्तर भारतात पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणा-या गार वा-यामुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट होईल. कमाल तापमान ३० तर किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांचा पुढील आठवडा गारेगार होईल, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. दरम्यान, सध्या मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, मुंबईतली थंडी किंचित कमी झाली आहे.
५ ते ११ फेब्रुवारीपर्यंतच्या संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा थंडी पडण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमीच असेल. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
- दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीच्या दोन ते तीन आठवडयात थंडी जाणवते तर शेवटच्या आठवडयाच्या आसपास मात्र थंडी कमी होत जाते.
- पहिल्या आठवडयात महाराष्ट्रात काहींशी थंडी जाणवेल तर आठवड्याच्या शेवटी थंडी कमी जाणवेल. थंडीच्या लाटेची शक्यता मात्र नाही. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या ५ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
कुठे किती तापमान
- अहमदनगर १३.४
- छत्रपती संभाजी नगर १५.५
- जळगाव १३.४
- कोल्हापूर १७.१
- महाबळेश्वर १३.९
- मालेगाव १४.६
- मुंबई १९.४
- नांदेड १७.४
- नंदुरबार १५.५
- नाशिक १३
- धाराशीव १७
- पालघर १९
- परभणी १५.३
- रत्नागिरी १८.७
- सांगली १६.१
- सातारा १४.२
- सोलापूर १८