शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर जोरदार टीका केली होती. त्याला आज भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मणिपूरवरून सल्ले देण्यापेक्षा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये काय जळतंय हे पाहावं. आदित्य ठाकरे हे २०२४ मध्ये वरळीमधून निवडणूक लढणार नाहीत, असा दावाही नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले की, मणिपूर जळतंय, म्हणून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे कालपासून ओरडा करताहेत. मणिपूरवरून मोठमोठे सल्ले देताहेत. मी सांगतो मणिपूरचा विषय सोडा. मणिपूरला कसं शांत करायचं, हे देशाचे गृहमंत्री अमित शाह बघतील. पण आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये काय काय जळतंय, कोण कोण जळतंय, याबद्दल थोडा विचार करा. याबाबतची थोडी माहिती जनतेपर्यंत येऊ दे. मणिपूरपेक्षा जास्त आग ही वरळी विधानसभेमध्ये लागलेली आहे. १३ जूननंतर आदित्य ठाकरेंचे किती बॅनर फाडले गेले. याची माहिती पुढे येऊ दे. सुनील शिंदेंसारख्या एका प्रामाणिक आणि निष्ठावान सैनिकाचं कसं खच्चिकरण सुरू आहे. हे तुम्ही कधी सांगणार नाही. ज्या सुनील शिंदेंनी वरळीमध्ये शिवसेना वाढवली, टिकवली, घराघरात पोहोचवली. आज त्या सुनील शिंदेंचं खच्चिकरण सचिन अहिर कशाप्रकारे करताहेत, हे तुमच्या कानावर आलं पाहिजे. अक्षरश प्रत्येक शाखेत आग लागलेली आहे.
मी खात्रीलायकपणे सांगू शकतो की, उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हे २०२४ ची विधानसभेची निवडणूक वरळीतून लढवणार नाहीत. ते हिंमत करणार नाहीत. कारण सचिन अहिर यांच्या माध्यमातून वरळीमध्ये जुन्या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. त्याची परतफेड ही २०२४ मध्ये आदित्य ठाकरेंना होणार आहे. त्यामुळे २०२४ मध्ये वरळीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा करा. आदित्य ठाकरेंनी मतदारांना एक प्रेझेंटेशन द्यावं. चार वर्षात काय काय केलं ते सांगावं, असं आव्हानही नितेशा राणेंनी यावेळी दिलं.