Join us

... म्हणून 'आदित्य'च्या ट्विटला उत्तर दिलं, अमृता फडणवीसांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 12:01 PM

आदित्य ठाकरेनी देवेंद्र फडणवीस यांना महिलांवरील विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं.

मुंबई - भाजपाने महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. त्यात, वारिस पठाण यांच्या विधानावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला बांगड्या भरल्या असतील, असे म्हणत टोला लगावला होता. मात्र, आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरुन फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं होतं. याबाबत अमृता यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. देवेंद्र यांनी महिलांचा कधीही अपमान केला नाही, याउलट ते महिलांना सातत्याने शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अमृता यांनी म्हटलं. 

आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना महिलांवरील विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले होते. आता, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिलं होता. आता, अमृता यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसेच, मी कशामुळे उत्तर दिलं, तेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.  

देवेंद्र फडणवीस यांनी बांगड्यांबाबत केलेलं वक्तव्य ही एक म्हण आहे. या वाक्यावरुन त्यांना महिलांचा अपमान करायचा नव्हता. कारण, एक महिला म्हणून केवळ मीच देवेद्र फडणवीस यांना चांगलं ओळखते. ते नेहमीच महिलांना शक्तिशाली बनविण्यासाठी प्रयत्न करतात. ते माझ्याही पाठीशी नेहमीच उभे असतात. मात्र, अशा व्यक्तीला या मुलानं (आदित्य ठाकरे) माफी मागायला लावणं मला पटलं नाही. त्यामुळं मी त्यांना उत्तर दिलं, असं अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीवेळी सांगितलं. 

फडणवीस ठाकरे वादात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून कुठलिही राजकीय टीपण्णी न करणाऱ्या अमृता यांनी आदित्य ठाकरेंच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या ''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्व आयतं मिळाल्याचं म्हटलं होतं. तर, देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :मुंबईआदित्य ठाकरेशिवसेनाअमृता फडणवीस