लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पार्टीला जाण्यापूर्वी अरबाज मर्चंटने सोबत चरस घेतल्याची माहिती आर्यन खानला देताच, त्याने त्याला विरोध करत हे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे सोबत चरस घेतले नसून फक्त मस्ती केल्याचे त्याने आर्यनला सांगितले. मात्र, एनसीबीच्या कारवाईदरम्यान लपवून आणलेल्या चरसबाबत आर्यनला समजल्याचे अरबाज मर्चंटने त्याच्या जबाबात नमूद केले आहे. त्यामुळे अरबाजने सोबत चरस बाळगल्याबाबत आर्यनला माहिती नसल्याचे त्याने एनसीबीला दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
यामध्ये अरबाज मर्चंटने दिलेल्या एनसीबीला दिलेल्या जबाबानुसार, मी आर्यनला लहानपणापासून ओळखतो. २ ॲाक्टोबरला क्रूझ पार्टीसाठी मी आर्यनला तयार केले. पार्टीला जाण्याआधी मी आर्यनच्या घरी गेलो. तेथून निघताना त्याला सोबत चरस घेतल्याचे सांगून मजा करू, असे सांगितले. मात्र आर्यनने विरोध केला. ड्रग्ज सोबत नेऊ नकोस हे चांगले नाही, त्यावर मी नाही घेत, असे म्हणालो. मात्र मी अंमली पदार्थ लपवले होते. ते क्रूझच्या गेटवर एनसीबीने माझी झडती घेतली तेव्हा आर्यनला कळाले.
पुराव्याअभावी क्लीन चिट मिळालेले सहा जण ठोस पुराव्यांअभावी आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल या सहा जणांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहे. त्यानुसार या सहा जणांना क्लीन चिट मिळाली आहे.
अशी मिळाली क्लीन चिट... आरोप क्रमांक १ आर्यनने अमली पदार्थ बाळगले. निष्पन्न : आर्यनने नव्हे अरबाज मर्चंटने अमली पदार्थ बाळगले होते. आरोप क्रमांक २ अरबाजकडून जप्त केलेल्या अमली पदार्थांची आर्यनला माहिती होती. निष्पन्न : अरबाजने दिलेल्या जबाबात, लपवून आणलेल्या अमली पदार्थांबाबत आर्यनला माहिती नसल्याचे सांगितले आहे. आरोप क्रमांक ३ अमली पदार्थांचे आर्यन आणि अरबाज सेवन करणार होतेनिष्पन्न : ते अमली पदार्थ आर्यन करता आणलेच नव्हते, अशी कबुली अरबाजने दिली आहे. आरोप क्रमांक ४ आर्यन हा काही अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता, याचे व्हाॅट्सॲप चॅट समोर आले होते. निष्पन्न : जे व्हाॅट्सॲप चॅट मुंबई एनसीबी टीमने आर्यनच्या मोबाईलमधून हस्तगत केले होते ते बेकायदेशीरपणे हस्तगत केले गेले होते. तसेच त्या व्हाॅट्सॲप चॅटची तथ्यता तपासली असता कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी त्या चॅटचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. आहे. फक्त व्हाॅट्सॲप चॅटच्या आधारे गुन्हा निष्पन्न होत नसल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोप क्रमांक ५ आर्यनने अमली पदार्थ सेवन केले. निष्पन्न : आर्यनला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली गेली नाही. त्यामुळे हा आरोप चुकीचा ठरला.