... म्हणून केला हल्ला, देशपांडे हल्लाप्रकरणातील आरोपींची कबुली; एक शिवसेनेचा पदाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:30 AM2023-03-04T11:30:53+5:302023-03-04T11:31:39+5:30
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला.
मुंबई - मॉर्निंग वॉक करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये, एक आरोपी हा शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असून काही दिवसांपूर्वीच त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टिकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिलीय.
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप मधील रहिवाशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचं समोर येतय. यातील एका व्यक्तीचे नाव अशोक खरात असून हा शिवसेनामहाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. भांडुपच्या कोकण नगर विभागचा तो रहिवासी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती ही त्याचाच सहकारी असल्याचे समजते आहे. आज सकाळी भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरातूनन त्यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खरातविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तो शांत होता. आता, खरातचे शिवसेना नेत्यांसमवेतचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत.
सीसीटीव्हीमुळे आरोपींचा तात्काळ शोध
पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. त्यामध्ये, आरोपी सदर ठिकाणाहून पलायन करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर, दोघांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.