Join us

पवारांच्या 'त्या' विधानावरुन शिवसेनेने केलं भाजपाला टार्गेट; आमच्या चिंतेचे कारण हेच आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 8:34 AM

पाकिस्तान घाबरले आहे, लटपटले आहे व बालाकोटच्या हल्ल्यानंतर अखेरच्या घटका मोजू लागले आहे, असे जे चित्र रंगवले गेले त्याला छेद देणारे विधान लष्करप्रमुखांनी केले व त्याचा संबंध विरोधकांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांशी जोडला आहे.

मुंबई -  चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी टोला मारला होता की, ‘पुलवामासारखी एखादी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातील सत्तांतर अटळ आहे.’ पवार यांचे हे विधान आश्चर्यकारक, तितकेच धक्कादायक म्हणावे लागेल. त्यावर भाजपने टीकेची झोड उठवली. पवारांच्या विधानानंतर लगेच लष्करप्रमुखांनी बालाकोटमधील दहशतवादी तळाची माहिती दिली. निवडणुका जवळ आल्या की बालाकोटचा मुद्दा कसा काय चर्चेत आणला जातो, लष्करप्रमुखांनी कुणाच्या राजकीय लाभासाठी विधाने करणे टाळावे, असे आता विरोधकांनी सुनावले आहे. लष्करप्रमुखांनी कुणाच्या राजकीय फायद्यासाठी हे विधान केले असावे असे आम्हाला वाटत नाही, पण राजकीय वातावरणाचा प्रभाव हा पडत असतो. सध्याचा माहोलच असा काही बनवला जात आहे की प्रत्येकजण एकाच प्रवाहात एकाच दिशेने सूर मारताना दिसत आहे असं सांगत शिवसेनेने भाजपाला टार्गेट केलं आहे. 

पाकिस्तान घाबरले आहे, लटपटले आहे व बालाकोटच्या हल्ल्यानंतर अखेरच्या घटका मोजू लागले आहे, असे जे चित्र रंगवले गेले त्याला छेद देणारे विधान लष्करप्रमुखांनी केले व त्याचा संबंध विरोधकांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांशी जोडला आहे. पाकिस्तानबाबत भय निर्माण करून निवडणुकांवर प्रभाव पाडला जात आहे असे विरोधकांना वाटत असेल तर त्यांचे निरसन कोणी करायचे? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे  

  • बालाकोट हल्ल्यानंतरही पाकडय़ांची खुमखुमी पुरती जिरलेली नाही. पेरले ते उगवते हे मान्य, पण पाकिस्तानात आपण जे मोडून काढले, उद्ध्वस्त केले, त्या राखेतून पुनः पुन्हा दहशतवादाची पिलावळ का जन्म घेत आहे? महाराष्ट्रात निवडणुका आहेत म्हणून चिंता वाटते. आमच्या चिंतेचे कारण हेच आहे.
  • लष्करप्रमुखांनी बोलायचे नसते, करून दाखवायचे असते, असा एक सैनिकी रिवाज आहे. बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ पुन्हा सक्रिय झाला अशी माहिती जाहीर करून आमच्या लष्करप्रमुखांनी काय साध्य केले? कश्मीरात काय चालले आहे याची माहिती अद्याप बाहेर दिली जात नाही. पण बालाकोटची हालचाल लष्करप्रमुखांनी समोर आणली आहे हे महत्त्वाचे. 
  • लोकसभा निवडणुकीआधी पुलवामा घडले व त्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोटवर हल्ले केले. त्या हल्ल्यात साडेतीनशेच्या आसपास दहशतवादी मारले गेले व त्यांचे तळ संपूर्ण उद्ध्वस्त झाले. मारलेल्या अतिरेक्यांचे पुरावे मागण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. साडेतीनशे अतिरेकी मारले हे मोजले कोणी? असे प्रश्न विचारले गेले. पुलवामा आणि बालाकोट हे भाजपच्या प्रचाराचे मुद्दे ठरले. 
  • पुलवामा घडले नसते तर भाजप ‘तीनशेपार’ पोहोचला असता काय? हा सवाल आहेच. आता 370 कलम हाच महाराष्ट्रातील प्रचाराचा मुद्दा करू असे भाजप हायकमांडने जाहीर केले. त्यात लष्करप्रमुखांनी बालाकोटमध्ये ‘जैश’चे 500 दहशतवादी आमच्या हद्दीत घुसण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले. 
  • भारत आणि अमेरिका दोन्ही देशांसमोर बालाकोटमधील ‘जैश’चे आव्हान उभे ठाकले आहे व लष्करप्रमुखांनी त्यास दुजोरा दिला आहे. आमचे मत असे आहे की, लष्करप्रमुखांनी अशी विधाने जाहीरपणे करण्याची गरज नाही. 
  • ‘जैश’चे 500 अतिरेकी खतम केल्यावर त्यांनी त्या कारवाईची माहिती फार तर देशासमोर ठेवावी. सर्व संकटांना व पाकच्या कुरापतींना धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य सज्ज आहे. गेली सत्तर वर्षे पाकिस्तानी सीमेवर आमचे सैन्य त्यांचे कर्तव्य चोख बजावत आहे. हिंदुस्थानी सैन्यात शौर्याचा उगम आजच झाला नाही.  
टॅग्स :पाकिस्तानशिवसेनाभाजपादहशतवादी