Join us  

... म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, आता आमच्या लोकांसह लवकरच एक्स्पान्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 4:13 PM

गुरुपौर्णिमेनिमित्त आल्याचे सर्वजण सांगत होते, मात्र कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन आता वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही शिंदे गटातील नेत्यांसाठीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नाही. ४ दिवसांपूर्वी अचानक मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, शिंदे गटातील आमदार आणि मंत्रीपदाचे इच्छुक दावेदार नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, गुरुपौर्णिेला शिवसेनेचे सर्व मंत्री आमदार ठाण्यात आले होते. येथीही राज्यातील राजकीय परिस्थितीवर या मंत्र्यांचं मंथन झालं असून मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याचं समजतंय. 

गुरुपौर्णिमेनिमित्त आल्याचे सर्वजण सांगत होते, मात्र कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री यांनी चर्चा केल्याची माहिती ठाण्यातून मिळाली आहे. यादरम्यान येत्या ९ दिवसांत आणखी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून ज्यांची नाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवली आहेत त्यांचा शपथविधी होईल ,अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली होती. आता, मंत्री दीपक केसरकर यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं असून लवकरच आमचे लोकंही शपथ घेतील, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

आमचे लोक अजिबात नाराज नाहीत. कारण, जेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. तेव्हाच आम्ही म्हटलं होतं की, जर आमचा एकही नेता मंत्री नाही बनवलं तरी चालेल, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला न्याय देतील, असे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, लवकरच कॅबिनेटचा विस्तार होईल. राष्ट्रवादीचे लोक आमच्यासोबत येणार होते, त्यामुळेच हा विस्तार रखडला असेल, पण आते तेही आलेत, आमचेही लोकं इथंच आहेत. मग, लवकरच विस्ता होईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार केल्यानंतरच एकत्रितपणे खातेवाटप जाहीर करतील की आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले जाईल या बाबतचा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा सोडवतात याबाबत उत्सुकता आहे. भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडील काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जातील, हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आधीच खातेवाटप जाहीर केले आणि महत्त्वाची काही खाती दिली तर विस्ताराची वाट बघत असलेल्या भाजप, शिंदे समर्थक आमदारांमध्ये अधिकच अस्वस्थता पसरेल. त्यावर दोन-तीन दिवसांत विस्तार करून एकत्रित खातेवाटपाचा तोडगा निघेल, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, तथापि, तिसरा विस्तार अनिश्चित असताना उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटपासाठी ताटकळत ठेवले तर माध्यमे त्यावर टीका करतील, असा दुहेरी पेच आहे.  

टॅग्स :शिवसेनादीपक केसरकर एकनाथ शिंदेमुंबई