'...म्हणून माझ्यावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राग', हिमाचल प्रदेशला पोहोचताच कंगनाचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:32 AM2020-09-15T04:32:34+5:302020-09-15T06:48:18+5:30
कंगनाने सोमवारी सायंकाळी टिष्ट्वट करून ठाकरे सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला.
मुंबई : चार दिवसांच्या मुंबईतील मुक्कामानंतर हिमाचल प्रदेशला परतलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत ऊठबस असलेली मंडळी माझ्यामुळे उघडी पडल्यानेच मुख्यमंत्री आणि राज्य सरकार माझ्याविरोधात गेल्याचा आरोप कंगनाने टिष्ट्वटरद्वारे केला.
कंगनाने सोमवारी सायंकाळी टिष्ट्वट करून ठाकरे सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला. बॉलीवूड माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यातील ड्रग्ज रॅकेटचा मी पर्दाफाश का केला, हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्षेप आहे. कारण, या सर्व मंडळींची त्यांचे लाडके चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासोबत ऊठबस आहे. त्यांना उघडे पाडले हाच माझा अपराध असून त्यामुळेच त्यांना माझा बंदोबस्त करायचा आहे. ठीक आहे, करा प्रयत्न. बघू कोण कोणाचा बंदोबस्त करते ते, असे ट्विट कंगनाने केले. याशिवाय, रक्षकच भक्षक असल्याचे जाहीर करत आहेत. लोकशाहीला धक्का लावला जात आहे. मला कमकुवत समजून मोठी चूक करत आहेत. एका महिलेला घाबरवून, माझा अवमान करून स्वत:ची प्रतिमाच मातीमोल करत आहेत, असेही कंगनाने शिवसेना नेतृत्वाचे नाव न घेता म्हटले.
चंदिगडला उतरल्यानंतर माझी सुरक्षाव्यवस्था नाममात्र करण्यात आली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. या वेळी वाचले, असेच वाटत आहे. एक काळ होता जेंव्हा मुंबईत आईच्या पदराची ऊब जाणवायची. आता अशी स्थिती आहे की, जीव वाचला तरी पुरे.
शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत आतंकी प्रशासनाचा बोलबाला झाल्याचा आरोपही कंगनाने टिष्ट्वट करत केला.
पाकव्याप्त काश्मीरची माझी टिपणी खरी
जड अंतकरणाने मुंबई सोडत आहे. ज्या पद्धतीने मला घाबरविण्याचा प्रयत्न झाला, रोज माझ्यावर हल्ले आणि शिवीगाळ झाली, माझे कार्यालय तोडल्यानंतर घर तोडायचा प्रयत्न झाला, माझ्याभोवतीच्या सशस्त्र सुरक्षारक्षकांना सतत दक्ष राहावे लागले, हा सारा घटनाक्रम पाहता पाकव्याप्त काश्मीरबाबतची माझी टिपणी तंतोतंत लागू पडल्याचा दावाही कंगनाने टिष्ट्वटद्वारे केला.