Join us

...म्हणून कोरोना उपचारांतून प्लाझ्मा थेरपीला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:06 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; वेगळा स्ट्रेन निर्माण होण्याचा धोकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावर उपचार नसताना प्लाझ्मा उपचार पद्धतीविषयी ...

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण; वेगळा स्ट्रेन निर्माण होण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनावर उपचार नसताना प्लाझ्मा उपचार पद्धतीविषयी जनजागृती करून त्याचा प्रभावी वापर करण्यात येत होता, परंतु केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळले. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. प्लाझ्मा उपचार पद्धतीतून कोरोनाचा वेगळा स्ट्रेन निर्माण होण्याचा धोका असल्याने, उपचारप्रक्रियेत ही पद्धत वगळल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

कोरोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच लक्षणे दिसल्यानंतर, पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी कोरोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केले जात होते. मात्र, अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नसल्याचे समोर आले आहे.

याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.जयेश लेले यांनी सांगितले, कोविडचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झालेले असू शकतात. असे स्ट्रेन ज्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीजवर मात करण्यासाठी पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात या थेरपीच्या माध्यमातून घातक स्ट्रेन निर्माण होऊ शकतात, यामुळे केंद्राच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

* सकारात्मक परिणाम नाही

कोरोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारात बऱ्या झालेल्या रुग्णांतील रक्तद्रव त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसऱ्या रुग्णास दिला जातो, तेव्हा त्या रुग्णात प्रतिकारशक्ती वाढून तो बरा होतो याला प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात. बऱ्या झालेल्या व्यक्तीचा रक्तद्रव टोचल्याने त्या व्यक्तीच्या रक्तात विषाणू किंवा जीवाणूविरोधात निर्माण झालेल्या ॲण्टीबॉडीज (प्रतिपिंड) नवीन रुग्णाला मिळतात. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती प्रणाली ही विषाणू किंवा जीवाणूशी चांगला लढा देते, असे समजले जाते. मात्र, आता कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णाच्या आजाराचा कालावधी यावर प्लाझ्मा थेरपीमुळे कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याचे वैद्यक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जर्नल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय अहवाल सांगण्यात आले आहे

........................................................