… म्हणून अमेरीकेसारखा कोरोना प्रकोप कॅनडात नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:31 PM2020-04-19T16:31:28+5:302020-04-19T16:32:17+5:30

दोन शेजारी राष्ट्रांच्या मानसिकतेतला फरक ठरला महत्वाचा

… So the Corona outbreak is not in Canada like the USA | … म्हणून अमेरीकेसारखा कोरोना प्रकोप कॅनडात नाही

… म्हणून अमेरीकेसारखा कोरोना प्रकोप कॅनडात नाही

googlenewsNext

संदीप शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - अमेरिका आणि कॅनडा ही दोन सख्खी शेजारी राष्ट्र. दोन देशांच्या सीमेवर लष्कर तैनात नसलेले हे जगातले एकमेव उदाहरण. केवळ व्यापार उदीमच नाही तर नोकरी धंद्याच्या निमित्ताने हजारो लोक दररोज या देशांच्या सीमा ओलांडतात. मात्र, कोव्हीड – १९ अमेरिकेत अक्षरश: हाहाकार उडवत असताना कॅनडाने हे संकट थोपवले आहे. दोन्ही देशांतले सरकार आणि जनतेच्या मानसिकतेत असलेल्या मूलभूत फरकामुळेच हे साध्य झाल्याचे मत कॅनडात स्थायिक असलेल्या गणेश साळूंखे यांनी लोकमतशी बोलताना मांडले.

कॅनडा आणि अमेरिकेत जवळपास एकाच वेळी कोरोनाचे संकट धडकले. अमेरिकन सरकारने त्याचे गांभीर्य लक्षात न घेता लोकांच्या जीवापेक्षा अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. ३९ हजार मृत्यू आणि साडे सात लाख बाधित असतानाही इथली जनता सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवून चक्क रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसते. ही ‘वूई डोण्ट केअर’ची आक्रमक मानसिकता कॅनडात नाही. इथले सरकारही सजग आहे. त्यांनी कोरोनाचा धोका वेळीच ओळखला. सीमा सील करून लाँकडाऊनचे आदेश जारी केले. नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार डाँलर्सचा (सुमारे ५४ हजार रुपये) दंड आणि प्रसंगी लष्करालाही रस्त्यावर उतरविण्याची तयारी ठेवली. परंतु, इथे दंड ठोठावण्याची वेळ आभावानेच येत असल्याचे गणेश सांगतात.

या महिन्यांत कॅनडातील तपमान ६ डिग्रीपर्यंत सुसह्य होते. त्यामुळे पार्ट्या, पिकनीकसाठी हा सुगीचा काळ. मात्र, स्वतःसह देशातील जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कॅनडातील बोच-या थंडीचा सामना मद्याशिवाय अशक्य असल्याने त्याचा समावेही अत्यावश्यक सेवेत आहे. सामान खरेदीसाठी एक व्यक्तीला घराबाहेर पडता येते. ज्यांना वर्क फाँम होम शक्य नाही ते कार्यालयांतही जातात. परंतु, कुठेही नियम आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन न करता. या खबरदारीमुळेच बाधितांची सख्या आजवर ३३ हजार आणि मृतांचा आकडा १४७० पर्यंत मर्यादीत आहे. कॅडातील विभक्त कुटुंब पद्धतीत मुले आई वडिलांसोबत राहत नाहीत. दुर्देवाने मृतांपैकी ६०- ७० टक्के रूग्ण हे वृध्दाश्रामातले असल्याचे गणेश यांनी खेदाने सांगितले. सक्षम आरोग्य सेवेमुळे हा आलेख कमी करण्यात सरकारला यश येत आहे. त्यामुळे अमेरिका किंवा युरोपीयन देशांप्रमाणे इथे भीतीचे सावट नसल्याचेही ते नमूद करतात.  

 

शाळा बंदीपोटी मिळतात २०० डाँलर्स : शाळा बंद असल्याने माझा मुलगा राजस सध्या घरीच आँनलाईन शिक्षण घेत असला तरी चाईल्ड बेनिफिट टॅक्स योजनेअंतगर्त माझ्या बँक खात्यात मासिक २०० डाँलर्स जमा होत असल्याचे गणेश यांची पत्नी प्रीती यांनी सांगितले. त्याशिवाय कर्जासह घराच्या आणि वाहनाच्या इन्शुरन्सलाही तीन महिन्यांची मुदताढ देण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.    

 

बेरोजगारांना सरकारी वेतन : इथले हजारो कर्मचारी दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्वावर काम करत असतात. आर्थिक अरिष्टामुळे त्यापैकी अनेकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. मात्र, त्यांनाही एम्लाँयमेंट इन्शुरन्स योजनेअंतर्गत वेतनाच्या ५० ते ६० टक्के रक्कम सरकारकडून दिली जात आहे.     

 

स्वतंत्र कोव्हीड १९ चॅनल : या संकटाचा सरकार कशा पध्दतीने मुकाबला करत आहे, रुग्णसेवेची परिस्थिती कशी आहे, लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यासाठी इथे स्वतंत्र टीव्ही चॅनल सुरू करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे प्रिमिअर (मुख्यमंत्री) आणि शहराचे महापौर दररोज संबोधन करतात.  

Web Title: … So the Corona outbreak is not in Canada like the USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.