...तर नव्या वर्षात कोरोनाची साथ आटोक्यात येणार!, भारतातील कोरोना विषाणूचे ‘डी ६१४ जी’ असे नामकरण
By अतुल कुलकर्णी | Published: December 22, 2020 04:50 AM2020-12-22T04:50:23+5:302020-12-22T04:51:08+5:30
coronaVirus News : टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी या माहितीला दुजोरा दिला असून आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विषाणू आढळलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने खळबळ उडाली असताना भारतात कोरोना विषाणूची साम्यस्थळे शोधली गेली. सगळ्या रुग्णांमध्ये एकाच प्रकारचा विषाणू आढळून आला. त्यामुळे संशोधकांनी त्याचे ‘डी ६१४ जी’ असे नामकरण केले आहे. देशातील सहा कंपन्या याच विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी लस बनवत आहेत.
टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी या माहितीला दुजोरा दिला असून आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विषाणू आढळलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. नव्या वर्षात दुसरी लाट येण्याची शक्यता दिसत नाही, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
जानेवारीचा महिना जर आपण काळजी घेतली तर नवे वर्ष चांगले जाईल, असेही डॉ. लहाने म्हणाले. एड्सच्या रुग्णांमध्ये एचआयव्हीचा ‘आरएनए’ सुरुवातीच्या काळात निश्चित होत नव्हता. त्यामुळे त्यावर लस येण्यास विलंब झाला. आता येणारी लस उपयोगी ठरणार आहे, असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.
राज्यात रुग्णांचे प्रमाण घटले
तारीख सॅम्पल पॉझिटिव्ह निगेटिव्ह
१४/१२ १४,९३७ ८७८ १४,०१७
१५/१२ १९,७९३ १३०१ १८,११६
१६/१२ १९,३४८ ११८१ १७,५६१
१७/१२ २०,५५२ १२९६ १८,७०८
१८/१२ १७,८३२ ११९० १६,२०३
१९/१२ १८,०६६ ११३० १६,७७८
२०/१२ ११,७९६ ६९३ १०,८४२
एकूण १,२२,३२४ ७,६७८ १,१२,२२५
मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत २४ वॉर्ड आहेत. प्रत्येकाची लोकसंख्या जवळपास सहा लाख आहे. त्यात प्रत्येकी १० ते २० रुग्ण निघाले तरीही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अडीचशे ते पाचशेच्या घरात जाते. आज रोज ५०० ते ७०० रुग्ण निघत आहेत. मात्र लोकांनी अनावश्यक गर्दी कमी केली, नाताळ, नवीन वर्षाचे स्वागत घरात बसून केले तर ही संख्या आणखी कमी होईल. - सुरेश काकाणी, सहआयुक्त, मुंबई महापालिका
व्हॅक्सिन काय करेल?
भारतात दिल्या जाणाऱ्या व्हॅक्सिनमुळे शरीरात बी नावाचे मेमरी सेल तयार होतील. शरीरात जर कोरोनाचे विषाणू आले तर हे मेमरी सेल त्यावर तुटून पडतील. आपल्याकडे हर्ड इम्यूनिटीद्वारेही हे होत असल्याचे दिसत असले तरी त्याचा अंदाज बांधणे तसे कठीण असते. त्यामुळे व्हॅक्सिन हा त्यासाठी उत्तम उपाय आहे.
- डॉ. तात्याराव लहाने,
संचालक, वैद्यकीय शिक्षण