मुंबई - बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनी आदित्य ठाकरेंवर कवित केली नसल्याचं म्हटलं. पण, बाळासाहेब ठाकरेंच्या 75 व्या वाढदिवसाला मी 125 ओळींची कविता केली होती. विशेष म्हणजे ती कविता मी 'मातोश्री'मध्ये त्यांना अर्पणही केली होती, अशी आठवण बिचुकलेंनी सांगितली. आदित्य ठाकरेंवर एखादी कविता केली का, या प्रश्नावर बिचुकले यांनी मजेशीर उत्तर दिले.
वरळी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी खास संवाद साधला. त्यावेळी, विविध प्रश्नावर मनसोक्त उत्तरे दिली. त्यामध्ये, शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीपासून ते राज ठाकरेंच्या उमेदवार न उभे करण्यापर्यंत सर्वच प्रश्नावर उत्तरे दिली. तसेच, राजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व म्हणून बाळासाहेब, विलासराव देशमुख आणि सद्यस्थितीत शरद पवार हे असल्याचं बिचुकले यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बिचुकलेंना कवि मनाचे राजे असल्याने तुम्ही आदित्य यांच्यावर एखादी कविता केली का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना कविता करण्यासाठी कर्म आणि कार्य मोठं असावं लागतं, असे म्हणत आदित्य यांच कार्य अद्याप काहीच नसल्याचं बिचुकले यांनी म्हटलं. मी कधीच कुणाकडे स्वत:हून जात नाही. त्यामुळे मी इतर कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी न मागता अपक्ष अर्ज दाखल केल्याचं बिचुकलेंनी सांगितलं.